तळोजामध्ये एमडीसह चरस जप्त
By admin | Published: February 5, 2017 02:51 AM2017-02-05T02:51:07+5:302017-02-05T02:51:07+5:30
अंमली पदार्थविरोधी पथकाने तळोजामध्ये धाड टाकून ६० ग्रॅम मेथ्याफेटामाइन (एमडी पावडर) व १०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. या प्रकरणी महम्मद साबीर
नवी मुंबई : अंमली पदार्थविरोधी पथकाने तळोजामध्ये धाड टाकून ६० ग्रॅम मेथ्याफेटामाइन (एमडी पावडर) व १०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. या प्रकरणी महम्मद साबीर महम्मद याकुब शेख व शोएब हनिफ खान या दोघांना अटक केली आहे.
नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. शहरातील टारझन, पांडेसह अनेक माफियांना गजाआड केल्यानंतर, आता पनवेल, उरण परिसरातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता व अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांना तळोजा परिसरामध्ये दोन व्यक्ती मेथ्याफेटामाइन व चरस विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ३ फेब्रुवारीला हॉटेल संतोष अँड जयेश समोर सापळा रचला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होंडा अॅक्टिव्हा एमएच ०१ सी यू ३३६० वरून दोन तरुण आले. या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यांच्याकडे प्लॅस्टिक पिशवीमध्ये ठेवलेली ६० ग्रॅम एमडी पावडर व १०० ग्रॅम चरस आढळून आले. या अंमली पदार्थांची किंमत २ लाख ३३ हजार रुपये आहे. या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर तळोजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त केली आहे.
आरोपींना अटक करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक माया मोरे, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डीले, आकाश मुके, रवींद्र राऊत, कासम पिरजादे, मनोज जाधव, सचिन भालेराव व इतरांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)