शिधापत्रिकेबाबत नागरिकांत संभ्रम, गॅस जोडणीधारकांचे रेशन कार्ड रद्द होणार का?; सर्वसामान्यांना भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:23 AM2021-04-03T01:23:32+5:302021-04-03T01:24:18+5:30
ration card News : शासनाने स्वस्त धान्य दुकादाराकडे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे.
- कांता हाबळे
नेरळ : शासनाने स्वस्त धान्य दुकादाराकडे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास ही शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. या अटीमुळे शिधापत्रिकाधारक संभ्रमात असून, गॅस जोडणीधारकांची शिधापत्रिका रद्द होते की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त करत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी असून, बहुतांश जणांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणीही आहे, कर्जत तालुक्यातील बहुतांश आदिवासी भागातही गॅस जोडणी आहे, काही ठिकाणी तर आदिवासींना वन विभागाच्या वतीने मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत, याचा उल्लेख हमीपत्रात देणे क्रमप्राप्त असल्याने आमचे रेशन कार्ड रद्द होतो की काय, या संभ्रमात ग्रामीण भागातील कार्डधारक आहेत.
या नमुना अर्जात अर्जदार त्याच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांची माहिती भरल्यानंतर एक हमीपत्र दिले आहे. हमीपत्राच्या मजकुरात अर्जदार शपथेवर सांगतो की, माझे नावे, तसेच माझ्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावे गॅस जोडणी नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव करून देण्यात आली आहे, अशा प्रकारचा मजकूर या शिधापत्रिका तपासणी नमुना अर्जात देण्यात आला आहे.
गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित?
गॅस जोडणी काळाची गरज आहे, केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस जोडणी दिली आहे, असे असताना शासनाच्या नवीन धोरणानुसार, आता सर्वसामान्य गरिबांना शिधापत्रिका ठेवायची असेल, तर गॅस जोडणी रद्द करावी लागेल आणि गॅस जोडणी ठेवायची असेल, तर शिधापत्रिका रद्द करावी लागेल, त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकासमोर निर्माण झाला आहे. शिधापत्रिकाधारकाकडे गॅस कनेक्शन असेल, तर शिधापत्रिका रद्द होईल, असा उल्लेख सदरच्या नमुना अर्जात केला आहे. असा नियम लागू झाला, तर अनेकांच्या शिधापत्रिका रद्द होऊन गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित राहतील, अशी शक्यता आहे.
शिधापत्रिका तपासणी मोहिमेंतर्गत कोणतेही गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित राहणार नाहीत, उज्ज्वला योजनेंतर्गत प्राप्त गॅस जोडणी दिलेल्या आदिवासींनाही नेहमीप्रमाणे धान्य मिळणार आहे. मात्र, सधन कुटुंबांचा या तपासणी मोहिमेत माहिती घेण्यात येत आहे.
- विक्रम देशमुख, तहसीलदार कर्जत
शासनाने तालुक्यातील सर्वच रेशनकार्डधारकांना रेशन दुकानदारांकडून तपासणी मोहिमेंतर्गत नमुना फार्म भरून देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सर्वसामान्य गरीब लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आम्ही गॅस जोडणी असल्याने स्वस्त धान्यपासून वंचित राहणार की काय, अशी भीती वाटत आहे. प्रशासनाने या संदर्भात खुलासा करून लोकांचा संभ्रम दूर करावा.
- सदानंद म्हसे,
सामजिक कार्यकर्ते