कळंबोली: पनवेल परिसरात अंतर्गत रस्त्यावर वाहनांची दुतर्फा पार्किंग केली जात आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहतूककोंडी, लहान-मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे. रस्त्यावरील केलेल्या या पार्किंगकडे वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष झाले आहे. दुतर्फा पार्किंगवर कारवाई करून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात अनलॉक झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरली आहेत. पनवेल परिसरातील अंतर्गत रस्ते लहान आहेत. त्यात वाहने रस्त्यावरच पार्किंग केल्याने पादचारी, तसेच नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. पनवेल रेल्वे स्थानक परिसरात पे अँड पार्किंगचे पैसे वाचविण्याकरिता दुचाकी बाहेर रस्त्यावर पार्क केले जात आहे. सम-विषम नियम फक्त कागदोपत्री राहिला आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले नागरिक वाहने रस्त्यावरच पार्क करतात. वाहन पार्किंगसाठी महापालिकेकडून पार्किंगची व्यवस्था करणे अपेक्षित आहे, परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर, कळंबोली येथे लोहपोलाद मार्केट असल्याने अवजड वाहनांची पार्किंगही डोकेदुखी ठरली आहे. एनएच ४ बी महामर्गावर कळंबोली सर्कलपासून काही अंतरावर अवजड वाहनांची पार्किंग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीसह पार्क केलेलली वाहने रात्री दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने या समस्येत वाढ होताना दिसत आहे.
ही आहेत ठिकाणेपनवेल, कळंबोली, कामोठे बाजारपेठ, पनवेल रेल्वे स्थानक परिसर, लाइन आळी, पनवेल बसस्थानक समोर, लाइफ लाइन हॉस्पिटलसमोरील रस्ता, सुधागड शाळा ते करवली नाका कळंबोली, उरण नाका, टपाल नाका, खांदा कॉलनी या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दुतर्फा पार्किंग केली जात आहे.