मधुकर ठाकूर
उरण : येथील जेएनपीटी अंतर्गत असलेल्या आरके एफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाच्या प्रशासनाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जेएनपीएकडे केली आहे. जेएनपीटी अंतर्गत असलेल्या आरकेएफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात पहिली ते १० वी पर्यंत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या अनेक तक्रारी पालकांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडे केल्या आहेत.
पालकांशी उद्धट वागणे, विद्यार्थ्यांना असुविधा तसेच ८ वी ते १० वी मराठी माध्यमाला शासनाकडून अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणे आदी तक्रारींचा समावेश आहे.पालकांच्या तक्रारींनंतर महेंद्र घरत यांनी जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची निवेदन देऊन मागणी केली.याप्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, जिल्हा युवक व क्रिडा विभागाचे जिल्हा अध्यक्ष आदित्य घरत, पालक समितीचे विश्वास पाटील, निलेश पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने विद्यालयाच्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन काँग्रेस पदाधिकारी व पालकांच्या शिष्टमंडळाला जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिले आहे.