पनवेल - भाजप विविध एजन्सीचा वापर करून सुडबुध्दीने विरोधकांवर कारवाई करीत असल्याच्या निषेधार्थ 30 रोजी पनवेल काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन याठिकाणी जोरदार निदर्शन करीत भाजपचा निषेध करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वात ही निदर्शन करण्यात आली. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून भाजपने 30 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड काढून आयटी विभागामार्फत काँग्रेसची खाती गोठवली. एवढेच नाही तर काँग्रेसला 1800 कोटींचा दंडही ठोठावला. त्यामुळे ही सुडबुद्धीनेच केलेली कारवाई असल्याचा आरोप सुदाम पाटील यांनी केला.
भ्रष्टाचाराचे आरोप करुन ईडीची कारवाई करायची आणि त्याच विरोधीपक्षातील नेत्याला भाजपमध्ये सामावून घ्यायचे असे कटकारस्थान सध्या देशात सुरू आहे. निवडणुका तोंडावर आल्या असून देशात भाजप विरोधात जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण बघून भाजपचा आत्मविश्वास डगमगीत झाला आहे. म्हणूनच इंडिया आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करुन खोट्या कारवायांच्या माध्यमातून अटक केली जात असल्याचेही सुदाम पाटील म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्यासह वैभव पाटील, शशिकांत बांदोडकर,शशिकला सिंग, अरुण कुंभार, अमित लोखंडे,विनीत कांडपिले,राकेश चव्हाण,किरण तळेकर , भारती जळगावकर, सुधीर मोरे, आदम धलाईत ,जयश्री खटकाले,कांती गंगर, जोस जेम्स, दिपाली ढाले, शौकत खान आदी उपस्थित होते.