मधुकर ठाकूर -
उरण : उरण, महाड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणण्याची गर्जना रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी गुरुवारी ( २२) उरण येथील जाहीर सभेतून केली आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर, उरण-महाड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या आगामी निवडणुकीतही महाआघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
उरण तालुक्यात मागील निवडणुकीत काँग्रेसच्या हाताला फक्त एकच ग्रामपंचायत लागली होती.मात्र रविवारी (१८) तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासह सत्ताही काबीज केली आहे.पिरकोन ग्रामपंचायतीवर तर मागील ४० वर्षांपासून असलेली शेकापची सत्ता उलथून टाकली आहे. तर धुतुमच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग लावून सत्ता काबीज केली आहे.
तसेच १५१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी २५ सदस्य कॉंग्रेसचे निवडून आणले आहेत.उरण तालुक्यातील कॉग्रेस पक्षाच्या विजयी झालेल्या सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी (२२) आयोजित करण्यात आला होता. उरण येथील एका हॉटेलमध्ये रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रेखा घरत,उरण शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, राजिप सदस्य बाजीराव परदेशी, माजी सदस्य डॉ.मनिष पाटील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक करताना उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी पराभवाने निराश होऊ नका असा सल्ला देतानाच आता नवोदितांना संधी द्या,पक्षीय हेवेदावे विसरून जाण्याचे आवाहनही म्हात्रे यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी उरण, महाड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणण्याची गर्जना केली.कॉग्रेसमधुनच गेलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमुळे भाजपला सुज आली आहे.मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मानसन्मान मिळत नसल्यामुळे कॉंग्रेसचे भाजपमध्ये प्रवेश केलेले कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी घरवापसीसाठी प्रयत्नशील असल्याचा दावाही महेंद्र घरत यांनी केला. यावेळी ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या सरपंच, सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.