आविष्कार देसाई / अलिबागराजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. याचा प्रत्यय रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अनुभवास येत आहे. राजकीय कट्टर विरोध असणारे काँग्रेस आणि शिवसेना अलिबाग तालुक्यात राजकीय पोळी भाजण्यासाठी एकाच तंबूत आले आहेत. धर्मांध आणि जातीयवादी पक्ष म्हणून शिवसेनेला सातत्याने हिनविणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेशी सलगी कशी चालते असा प्रश्नही त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.रायगड जिल्हा परिषदेवर सध्या शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. सुरुवातीला शेकाप आणि शिवसेना अशी युती रायगड जिल्हा परिषदेवर होती. शेकापने शिवसेनेशी फारकत घेत. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चुल मांडली. सत्तेमध्ये काँग्रेसचा आता सहभाग राहीलेला नाही. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आघाडी केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सत्तेपासून रोखण्यासाठी अलिबाग तालुक्यामध्ये काँग्रेस-शिवसेनेने एकत्र येणे गरजेचे आहे. असा सूर तालुक्यातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लावला होता. तसे न झाल्यास पक्षाचा आदेश न जुमानता शिवसेनेबरोबर जाणार असल्याचा पवित्राच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत सातत्याने घेतला होता. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर मात्र याबाबतीतमध्ये नाखूष दिसत होते. स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची भाषा त्यांनी बॅ.अंतुले भवनमधून केली होती. अखेर त्यांनाही दोन कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातर युतीवर शिक्कामोर्तब करावे लागले आहे. अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली होती. या बैठकीत युती करण्यावर एकमत झाले होते. कोणत्या पक्षाने कोणत्या जागेवर लढायचे यावर रविवारी रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. चेंढरे आणि शहापूर जिल्हा परिषद मतदार संघातील जागा कोणी लढवायीच हे अद्याप ठरलेले नाही. थळमधील एक जिल्हा परिषद मतदार संघ आणि दोन्ही पंचायत समितीच्या जागा शिवसेना लढविणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मापगावमधील एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीच्या जागा काँग्रेस लढविणार असल्याचे समजते. अन्य जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायच समितीच्या १० जागांवर अद्याप शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
काँग्रेस, शिवसेना एकाच तंबूत
By admin | Published: January 23, 2017 5:47 AM