ठाणे : जिल्ह्यातील ६ महानगरपालिकांना खाडी किनारा लाभला आहे. याचा उपयोग करून जलवाहतूक तेथे लवकर सुरु अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्याकडे केली आहे. ती सुरू झाल्यास वाहतूककोंडी आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत होईल, तसेच ती नागरिकांच्या सोयीची ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. ठाणे जिल्ह्याला ३२ किलोमीटरचा खाडी किनारा लाभला असून या खाडीतून जलवाहतुकीचा मार्ग उपलब्ध केल्यास ठाणे, नवी मुंबई , कल्याण-डोंबिवली, भिवंडी , मीरा-भार्इंदर तसेच वसई -विरार या महापालिका एकमेकास जोडल्या जातील. त्यामुळे होणारी वाहतूककोंडी व प्रदूषणास नक्कीच आळा बसेल. तसेच शहरातील नागरिकांना बोटीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळेत पोहचता येऊ शकते. या जलवाहतुकीच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही तत्त्वता मान्यता मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंजुरी देऊन जेटीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ठाणे शहराअंतर्गत कळवा खाडीतील खडक फोडून काढल्यास नवी मुंबई कडे जाणारा जलवाहतूक मार्ग सर्व नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
सहा महापालिका जलवाहतुकीने जोडा
By admin | Published: January 03, 2017 5:24 AM