महाराष्ट्र-गुजरातच्या नद्या जोडणार
By admin | Published: January 20, 2016 02:03 AM2016-01-20T02:03:29+5:302016-01-20T02:03:29+5:30
पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे.
पनवेल : पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. भविष्यात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी आतापासून नियोजन हाती घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केले.
ओडिशा येथील कार्यक्रम आटपून रेल्वेमार्गे भारती पनवेलला आल्या होत्या. याठिकाणी विश्रामगृहात पत्रकारांशी सदिच्छा भेट घेतल्यावर त्या मुंबईला रवाना झाल्या. गंगा स्वच्छता अभियानावर दृष्टिक्षेप टाकताना भारती म्हणाल्या की, हे अभियान यशस्वी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आग्रही आहेत. गंगेच्या पात्रात स्वच्छता अभियान प्रभावीपणे हाती घेण्यात आले असून, दोन ते तीन वर्षांत नदी स्वच्छ होईल. गंगेच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याकडेही सरकार लक्ष देत असल्याचे भारती यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तापी नदीचे पाणी जमिनीत सोडण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणार असून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणता येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचेही भारती यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षा चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, बांधकाम सभापती राजू सोनी, पंचायत समितीचे सदस्य नीलेश पाटील, तहसीलदार दीपक आकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)आमदार प्रशांत ठाकूर हे युवा आमदार असून त्यांचे काम अतिशय चांगले असल्याचे सांगत उमा भारती यांनी कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. भीमाशंकरला जाताना आपण एकदा पनवेलला थांबले होतो, त्यानंतर आता योग आल्याचे भारती यांनी सांगितले.