रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मालवाहक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:36 AM2019-11-12T00:36:20+5:302019-11-12T00:36:23+5:30
कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून मालवाहक हमाल सामान घेऊन जात असताना फलाट क्रमांक तीनवर धोकादायक पद्धतीने झुकलेल्या पत्र्यांमुळे गंभीर जखमी झाला;
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून मालवाहक हमाल सामान घेऊन जात असताना फलाट क्रमांक तीनवर धोकादायक पद्धतीने झुकलेल्या पत्र्यांमुळे गंभीर जखमी झाला; त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून हाताचे बोट तुटतातुटता वाचले; मात्र बोटातील नसा तुटल्या आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वीपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील इमारतीचे पत्रे धोकादायक पद्धतीने बसविले आहेत. हे पत्रे फलाटावर आल्याचे निदर्शनास आणून देत आहे. तरीदेखील आजतागायत फलाट क्रमांक तीनवरील धोकादायक ठरत असलेल्या पत्र्यांकडे कर्जत रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज मालवाहक हमाल गंभीर जखमी झाला आहे. फलाट क्रमांक तीनवरील इमारतीचे पत्रे फलाटावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी घातक ठरू शकतात, हे अनेकदा कर्जत रेल्वे प्रशासनास निदर्शनास आणून दिलेले होते. तरीदेखील कर्जत रेल्वे प्रशासनाकडून समस्या सोडविण्याबाबत काहीही हालचाल करण्यात आली नाही. जर मालवाहक हमालाऐवजी एखादी महिला आपल्या बाळास कडेवर घेऊन जात असताना अशा प्रकारची घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
फलाट क्रमांक तीनवरील इमारतीचे पत्रे प्रवाशांच्या मान व खांद्यापर्यंतच्या अंतरावर धोकादायक पद्धतीने झुकलेले आहेत. त्यामुळे फलाटावरून जाणाºया प्रवाशांच्या मानेला, हाताला, डोक्याला गंभीर जखम होऊ शकते. धारधार पत्र्यामुळे एखाद्या प्रवाशाची मान कापून त्याचा मृत्यूही होऊ शकतो. तरी, भविष्यात फार मोठी दुर्घटना घडण्याअगोदर कर्जत रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक तीनवरील इमारतींची उंची वाढवून प्रवाशांना धोकादायक ठरणारे इमारतीचे पत्रे योग्य त्या मापात फलाटापासून वरच्या दिशेला न्यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत
आहे.