पनवेल : पनवेलजवळील उरण-जेएनपीटी मार्गावरील चिंचपाडा गावाच्या हद्दीत नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी काम सुरू असताना पुलाच्या लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळल्याने पाच कामगार जखमी झाले.शनिवारी सकाळी उड्डाणपुलासाठी लागणाºया लोखंडी सळ्यांचा सांगाडा चढविण्याचे काम सुरू होते. मात्र, अचानक हा सांगाडा व सोबत असलेले पत्रे खाली कोसळल्याने, या ठिकाणी काम करणारे कार्तिक सरदार, सुमंता सरदार, दीपक भिवर, टुबा भिवर, टुलाल मलिक हे कामगार जखमी झाले. त्यांना येथील उन्नती रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन दुर्घटनेची माहिती घेतली असून, पनवेल शहर पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे. जखमी पाचपैकी १ कामगार गंभीररीत्या जखमी झाला आहे. संबंधित काम हे बिल्टकोण कंपनीशी संबंधित आहे. काम करताना सुरक्षेच्या साधनांचा वापर न केल्याने ही घटना घडली, असा आरोप करीत गावक-यांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.कळंबोली जेएनपीटी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक वेळा कंत्राटदाराकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे गावकºयांनी सांगितले.कंत्राटदाराकडून करण्यता आलेल्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या जिवावर बेतल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तरीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळेच या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. याकडे लक्ष देऊ सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे.कारवाईची मागणीपनवेलजवळील उरण-जेएनपीटी मार्गावरील चिंचपाडा गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच कामगारांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
उरण-जेएनपीटी मार्गावरील पूल उभारताना कोसळला सळ्यांचा सांगाडा, पाच कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:19 AM