बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: October 15, 2015 01:50 AM2015-10-15T01:50:39+5:302015-10-15T01:50:39+5:30
तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधलारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला
अलिबाग: तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधलारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. येत्या पाच दिवसांत रस्त्यांच्या कामांना सुरुवात करावी अन्यथा अधिकाऱ्यांना अलिबाग तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात येईल, असा इशाराही कॉंग्रेसने दिला.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी माजी आमदार मधुकर ठाकूर व काँग्रेस नेते सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवस, कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा, कार्लेखिंड ते हाशिवरे मार्गे रेवस, अलिबाग-वडखळ, अलिबाग-रेवदंडा-मुरूड, अलिबाग-रोहा या रस्त्यांतील खड्डे आणि त्यामुळे पसरलेली धूळ यामुळे श्वसनाच्या विकारांनी आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे काँग्रसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी खोब्रागडे यांच्या निदर्शनास आणून दिले. अलिबाग तालुक्यांतील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर काँग्रेसने अलिबाग-रेवस, कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा येथील धोकादायक खड्ड्यांची चित्रफीतच बांधकाम विभागाकडे सादर केली. या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. निकृष्ट दर्जाची कामे करूनही संबंधित ठेकेदारांविरोधात बांधकाम विभाग कोणतीही कायदेशीर कारवाई करीत नाही. या मार्गांची दुरुस्ती येत्या पाच दिवसांत सुरू झाली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास आपल्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसने निवेदनात दिला आहे. लवकरच कामांना सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन खोब्रागडे यांनी दिल्याटे सुनील थळे यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे रायगड लोकसभा अध्यक्ष अॅड. उमेश ठाकूर, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे, चंद्रकांत खोत, किशोर सातमकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.