कळंबोली : कळंबोलीच्या वरच्या भागात म्हणजे रोडपाली क्षेत्रात इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, बांधकाम साहित्य पदपथावर ठेवल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
इमारत उभारताना बांधकाम साहित्याचा, तसेच खोदकामाचा परिसरातील स्थानिकांना त्रास होऊ नये, यासाठी काही नियमावली आहे. मात्र, व्यावसायिकांकडून त्याला बगल देण्यात येत आहे. सिडको तसेच महापालिकेने संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करून पदपथ मोकळे करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रोडपाली परिसरात भराव टाकून साडेबारा टक्के योजनेकरिता भूखंड वाटप करण्यात आले आहे. पैकी काही भूखंड बिल्डरांनी विकत घेऊन बांधकाम सुरू केले आहे. मात्र, विटा, काँक्रीटचे ब्लॉक्स आदी साहित्य पदपथावर ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सेक्टर १६ मध्ये आनंद रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या भूखंडावर सध्या बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी वापरण्यात येणाºया विटा पदपथावर ठेवण्यात आल्या आहेत.
नंदन गृहनिर्माण प्रकल्पातील वाळू आणि सिमेंटच्या गोण्याही, विटा पदपथावर ठेवल्या आहेत. याच सेक्टरमध्ये साकेत धाम या सोसायटीच्या बाजूला नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्याकरिता आवश्यक असणारे सिमेंट ब्लॉक वर्दळीच्या पदपथावर ठेवण्यात आले आहेत. सेक्टर १७ येथील उडाण बिल्डिंगचे काम सुरू असून, बांधकाम साहित्य ठेवण्यात आल्याने वर्दळीत अडथळ्याचे ठरत आहे.
पोलीस मुख्यालयाच्या रस्त्यावरही बिल्डिंगचे काम सुरू असून त्याचे साहित्यही विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे. रोडपाली गावाकडे जाणाºया पदपथावरही विटा ठेवण्यात आल्या आहेत. याच परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू असून त्याचे साहित्यही रस्त्यावर टाकण्यात आले आहे.
पदपथाची तोडफोड
डी-मार्ट रस्ता तसेच कामोठे-रोडपाली रस्त्यावर प्लॅटिनिया हा गृहप्रकल्प सुरू आहे. या बिल्डरने समोरचे पावसाळी गटार आणि पदपथ तोडून मनमानी करीत पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभीकरण केले आहे. याकरिता त्याने रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. याबाबत सिडको आणि महापालिका यांनाही कल्पना नाही.
तळोजा लिंक रोड बेकायदेशीर जोडणी
तळोजा लिंक रोडलगत आणि नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या बाजूला एक गृहप्रकल्प सुरू आहे. त्या बिल्डरने लिंक रोडवर काँक्रीटीकरण करून आत येण्याचा रस्ता तयार केला आहे. याकरिता सिडकोची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. दुसरीकडून रस्ता असताना त्या बिल्डरने नियम तोडून तळोजा लिंक रोडवर रस्ता बनवला आहे. तसेच अनधिकृत फलक लावण्याचे काम सुरू आहे.