गणेश प्रभाळे दिघी : गेल्या काही महिन्यांपासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील ग्रामस्थांना प्रत्यक्षातील रीडिंगपेक्षा अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे़ वाढीव रीडिंग याशिवाय रीडिंगच नसलेले व बिल भरण्याची मुदत संपून गेल्यावर ते हातात मिळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या विरोधात तक्रार करण्यासाठी वीजग्राहकांनी बुधवार, ११ सप्टेंबर रोजी बोर्लीपंचतन कार्यालयात धडक दिली. मात्र, नेहमीसारखे अधिकारी कार्यालयात नसल्याने महावितरण या ठेकेदारांवर कारवाई न करता त्यांना अभय देत आहे. याचा त्रास ग्राहकांना होत असल्याचा संताप ग्राहकांनी व्यक्त केला.
परिसरातील ग्रामस्थांना भरमसाठ वीज देयक येत असल्याने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. रीडिंग घेणारे कर्मचारी हे अप्रशिक्षित असल्यामुळे मीटरमधील कोणता आकडा रीडिंगचा आहे, हेसुद्धा त्यांना कळेनासे झाले आहे. योग्य माहिती नसल्यामुळे ते कर्मचारी जो आकडा दिसेल, त्याचे छायाचित्र काढून त्याप्रमाणे देयक तयार करीत आहेत. त्यावरूनच वीज वितरण कंपनी आकारणी करून ग्राहकांच्या माथी तेच देयक थोपवित आहे. वाढीव देयकामुळे वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ वीज देयक दुरुस्ती करण्याकरिता ग्राहक महावितरण कार्यालयात गेले असता अधिकारी कार्यालयात नसून तेथील कर्मचारी त्यांना सहकार्य करीत नाहीत, तेथे कर्मचारी असलेच तर ते ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवितात. तुमचे देयक बरोबर आहे, तुम्ही पैशांचा भरणा करा, अन्यथा वीज कापण्यात येईल असे सांगून ग्राहकांची वेळ मारून नेतात, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
महावितरणच्या या भोंगळ कारभाराने श्रीवर्धन तालुक्यातील हजारो ग्राहक त्रस्त झालेत. ‘घरचे झाले थोडे आणि महावितरणने धाडले एजन्सीच्या जाचाचे घोडे’ अशी अवस्था झाली आहे. घरगुती ग्राहकांना दर महिन्याला बिलाचे वाटप करण्यात येते. वीज बिलाची रीडिंग घेणे, बिल प्रिंट झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचविणे ही कामे महावितरण एजन्सीतर्फे केली जातात. त्यासाठी प्रत्येक बिलामागे पाच ते दहा रुपये देण्यात येतात. मात्र, बिल प्रिंट चुकल्याने वीज बिलावर मीटरचे किती रीडिंग झाले हे कळत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक चुकीचे वीज बिल आल्याची तक्रार महावितरणाकडे करतात. त्यांचे निरसन करायलाही महिने-दोन महिने जातात. अनेक बिलांवर स्पष्ट प्रिटिंग नसल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागतो. दर महिन्यात चुकीचे बिल मिळाल्याने आर्थिक फटका ग्राहकांना बसतो. वीजग्राहकांच्या या समस्यांबाबत एजन्सीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. बोर्लीपंचतन विभागीय दुय्यम अभियंता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.गेले पाच ते सहा महिने वाढीव बिल मिळत आहे. ते कमी करण्यासाठी बोर्लीहून श्रीवर्धनला एक नाही तर चार वेळा ये-जा होते. आता तर रीडिंगप्रमाणे बेरीज चुकली आहे, हेसुद्धा पाहिले जात नाही, हे सारे संतापजनक आहे. एजन्सीवर कारवाई करावी. - हेमंत किर, वीजग्राहक, वडवलीऑगस्ट महिन्यातील बिल माझ्या हातात १० सप्टेंबरला आले, मुदत संपल्यावर बिल मिळाल्याने जादा रुपये नाहक भरावे लागतात, दर वेळी हीच अवस्था असते. - अमित तोंडलेकर, बोर्लीपंचतनवरिष्ठांच्या सूचनेनुसार वीज बिल कलेक्शनसाठी बाहेर जावे लागते, त्यामुळे कार्यालयात थांबता आले नाही. - निखिल नावकार, अभियंता, बोर्लीपंचतन