जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:08 AM2019-09-02T01:08:37+5:302019-09-02T01:08:42+5:30
भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य : प्लॅस्टिकबंदीमुळे विद्युत रोषणाईवर भर; पर्यावरणपूरक साहित्यालाही मागणी
अलिबाग : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाच्या आगमनामुळे वातावरणात प्रसन्नता आणि उत्साह निर्माण झाला आहे. दीड दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत बाप्पाचा मुक्काम भक्तांच्या घरी राहणार आहे. बाप्पाच्या सेवेत कसलीच कमतरता राहू नये, यासाठी जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी चांगलीच धूम आहे. सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, हार, फळे अशा हरतºहेच्या वस्तूंना बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठ फुलून गेल्या आहेत.
घरगुती अथवा सार्वजनिक मंडळाचा गणेशोत्सव हा उत्सव अधिकाधिक प्रकाशित करण्यासाठी भाविक आकर्षक विद्युत रोषणाई करण्यावर भर देतात. त्या दृष्टीने विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. विद्युत रोषणाईच्या बाजारपेठेमध्ये यंदा भारतीय वस्तू नव्याने दाखल झाल्या आहेत. एलईडी, दहा ते शंभर वॉटच्या सिंगल-मिल्टकलर फ्रेड लाइट्स, झालर यासारखे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळत आहे. याबरोबरच रोब लाइट्स, लेझर लाइट्स, पार लाइट्स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र , एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, फळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तीन रंग, सहा रंग ते १६ रंगांच्या एलईडी स्ट्रीप सेटलाही जास्त मागणी असल्याचे दिसून येते. त्यांच्या किमती ८० रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत आहेत. स्वदेशी वस्तू महाग असल्या तरी त्या खरेदी केल्या जात आहेत.
सार्वजनिक मंडळांचेही सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसापासून बाप्पाचे रक्षण करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोख व्यवस्था केल्याचे दिसून येते.
पेणच्या बाजारात गणेशभक्तांची लगबग
१पेण : उत्सवाच्या खरेदीसाठी पेणच्या बाजारापेठेत अलोट गर्दी उसळली होती. फळे, फुले, मेवा, मिठाई, पूजेसाठी २१ पत्री, धूप, अगरबत्ती, विविध प्रकारच्या शोभेची फुले, कापडी तोरण, दही, दूध, मध, तूप, लोणी, केशर, नारळ आदी वस्तूंच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची सकाळपासून लगबग सुरू होती.
२पावसाचा व्यत्यय असला तरी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. एकीकडे बाजारात झुंबड उडाली असताना, दुसरीकडे वाहतूककोंडीमुळे पेण शहरात जागोजागी नागरिकांना मुख्य रस्त्यावर मार्ग काढण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागत होते.
३गणेशमूर्ती नेण्यासाठी खासगी वाहने, स्थानिक वाहने, एसटी महामंडळाच्या बसेस, दुचाकी, टेम्पो या वाहनांची रेलचेल सतत सुरू होती.