वीज बिल भरण्यासाठी ग्राहक तासन्तास रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:54 AM2019-08-03T00:54:18+5:302019-08-03T00:54:37+5:30
उशिरा बिल येत असल्याने संताप : पावसाचा त्रास; पर्यायी व्यवस्थेची मागणी
नेरळ : वीज ही मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. मात्र, याचे नियोजन नसल्याने ती ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नेरळ परिसरात तारखेच्या नंतर बिल दाखल होत असल्याने आणि ती भरण्यासाठी सध्या एकच ठिकाण कार्यरत असल्याने तासन्तास पावसाचा मारा सहन करत ग्राहकांना रांग लावून उभे राहावे लागत आहे. आधीच वाढीव बिल त्यात खूप वेळ रांगेत उभे
राहावे लागल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त के ला जात आहे. तेव्हा ही बिलाची डोकेदुखी कधी संपणार आणि पर्यायी व्यवस्था कधी होणार, असा प्रश्न महावितरणच्या नेरळ परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
नेरळ हे ग्रामपंचायत क्षेत्र लोकसंख्येच्या दृष्टीने नगरपालिकेच्या तुलनेने आहे. खूप झपाट्याने नेरळ आणि परिसरातील गावांचे नागरीकीकरण होत आहे, त्यामुळे येथे महावितरणचे कार्यालयही दोन आहेत. मात्र, ते कोसावर आहेत. त्यात बिल भरण्याची सुविधा अपुरी आहे. मागे नेरळमध्ये जागृती नागरी सहकारी बँक व रायगड जिल्हा मध्यावर सहकारी बँकेत महावितरणची बिले भरण्याची सुविधा होती. मात्र, काही कारणाने जागृती नागरी सहकारी बँकेची नेरळ येथील शाखा बंद झाली आणि बिलांचा भार रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पुन्हा आला. त्याच दरम्यान नेरळ येथील पाडा विभागात कर्नाळा सहकारी बँक सुरू झाली आणि तिथेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली. महावितरणचे ग्राहक आनंदले; जास्त वेळ रांगेत थांबावे लागणार नाही, अशी त्यांची समजूत झाली असताना सुरुवातीच्या काळात तिथे इंटरनेट अनेक वेळा बंद पडत असल्याने जास्त वेळ बिल भरलेच जात नव्हते. नंतर ती समस्या सुटल्यावर कर्नाळा बँकेत बिल भरले जाऊ लागले तर रायगड बँकेत इंटरनेट समस्या उद्भवली आहे. त्यामुळे कधीही एकच बँक बिल भरण्यासाठी उपलब्ध असल्याचे चित्र असते. एकतर आधीच विविध आकाराने लाइट बिलांच्या रकमेचा आकडा फुगलेला त्यात तो भरण्यासाठी भरपावसात नाहीतर कडक उन्हात ग्राहक रस्त्यावर तासन्तास उभे, याचा त्रास ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसोबत आलेल्या महिलांना होत आहे. महावितरणने डिजिटल वॅलेटने सुविधा जरी पुरवली असली तरी ग्रामीण भाग असल्याने आणि बहुतांश लोकांना ही सुविधा वापरायला जमत नसल्याने आणि बिलाची पहिली तारीख निघून गेल्यावर बिल हातात पडत असल्याने मोठ्या प्रमाणात बिल भरण्यासाठी गर्दी होताना दिसते.
नेरळ येथे दोन विद्युत बिल भरणा केंद्र आहेत. ग्राहकांची गर्दीची समस्या लक्षात घेता आम्ही संबंधित बँकेला उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच नेरळ येथील महावितरण कार्यालयात डिजिटल पद्धतीने बिल भरण्यासाठी सोय केली जाणार आहे. या व्यतिरिक्त नेरळ परिसरात नागरी पतसंस्था उपलब्ध झाल्यास ग्राहकांसाठी तिथे बिल भरण्याची सुविधा केली जाईल ही बाब विचाराधीन आहे.
- आनंद घुले, उपअभियंता, महावितरण, कर्जत