फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ

By निखिल म्हात्रे | Published: October 20, 2022 05:43 PM2022-10-20T17:43:12+5:302022-10-20T17:44:44+5:30

सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षे सततच्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे अजूनतरी बाजारात शांततेचाच माहोल आहे.

Consumers turn back to purchase crackers as prices rise in alibaug | फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ

फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ

Next

अलिबाग - दिवाळीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना प्रादुर्भावाने मागील दोन वर्षे दिवाळी साधेपणाने साजरी केली. परंतु, यंदा फटाक्यांवरील बंदी हटविण्यात आल्याने बार फुटणार हे नक्की. परंतु अद्याप ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरविल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षे सततच्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे अजूनतरी बाजारात शांततेचाच माहोल आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदाची दिवाळी साधेपणानेच, परंतु थोडी जल्लोषात साजरी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पण, असे असले तरीसुद्धा याचा मोठा फटका विक्रेत्यांना बसत आहे.

दरवर्षी दिवाळीची तयारी जवळपास 15-20 दिवस आधीच सुरू व्हायची. परंतु, कोरोनामुळे गेली दोन वर्षे या तयारीची लगबग हळूहळू कमी होताना दिसत आहे. तसेच सध्या लॉकडाऊनची टांगती तलवार या सणावर नसली तरीसुद्धा बाजारपेठांतील दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने दुकानदारांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतु, कोरोनापूर्वी असणारी फटाक्यांसाठीची मागणी तेवढी दिसून येत नसल्याने पूर्वीसारखा धंदा होण्याची शक्यता फार तुरळक वाटत आहे.

फटाक्यांचे भाव वाढले 

दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु, यंदा फटाक्यांमध्ये फारसे काही नाविण्य पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे सालाबादप्रमाणे फुलबाज्या, पाऊस, चक्र, टिकल्या, बंदुका, आपटी बॉम्ब, रॉकेट, मटका बॉम्ब, लॅनटर्न, सुतळी बॉम्ब, लवंगी, लक्ष्मी बार व या सगळ्या प्रकारांमध्ये लहान-मोठ्या आकारांचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साधारणपणे 100 रुपयांपासून दोन-तीन हजारांपर्यंत या फटाक्यांच्या किमती आहेत. परंतु, अजूनही हव्या त्या प्रमाणात ग्राहकांची ये-जा नसल्याने मालाचा खप फारसा झालेला नाही.

फटाके अद्याप दुकानातच 

गेल्या वर्षी आणि यावर्षी धंद्याची परिस्थिती सारखीच असल्याचे, तसेच कोरोनामुळे सगळ्यांकडेच पैशांची कणकण भासत असल्याने आधीच ग्राहक नाहीत व त्यातही खरेदीसाठी येणारे ग्राहक सामानाचा भाव करून नेतात. परंतु, काहीच धंदा होत नसल्याने ग्राहक करत असलेल्या भावांसोबतच तडजोड करत असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

कोरोनामुळे सगळेच धंदे मंदावले आहेत. परंतु, आता लोकांची सगळीकडे वर्दळ सुरू झाली असल्याने ग्राहकांची पावले हळूहळू दुकानांकडे वळण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे यंदा जरा बरा धंदा होईल, असा अंदाज आहे.

- केदार मगर, फटाका विक्रेता.
 

Web Title: Consumers turn back to purchase crackers as prices rise in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.