काशिद येथे देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
By admin | Published: January 28, 2017 03:00 AM2017-01-28T03:00:13+5:302017-01-28T03:00:13+5:30
मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका टेम्पोमध्ये चोरटी दारू विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ
नांदगाव/मुरुड : मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका टेम्पोमध्ये चोरटी दारू विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात मुरु ड पोलिसांना यश आले आहे. या टेम्पोमधून तीन लाख ६८ हजार १६५ रु पयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
२५ जानेवारी रोजी एका महिलेच्या घरासमोर एमएच ०६-बीजी -१९३८ हा दारूने भरलेला टेम्पो माल पुरवठा करण्यासाठी आला होता. काशिद ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी अमलात आलेली असून येथे गावातील अथवा बाहेरील व्यक्तीस दारू विकण्यास सक्त मनाई आहे. परंतु असे असताना देखील येथील एक आदिवासी महिला चोरून दारू विकत असल्याचा सुगावा काशिद ग्रामस्थांना लागला होता. दारूने भरलेला टेम्पो ज्यावेळी माल पुरवठा करण्यासाठी आला, त्याच वेळी काशिद ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे, पोलीस पाटील ऊर्मिला सावंत, परवेश बेलोसे, रोहन खोपकर, भालचंद्र बेलोसे, मनोहर बेलोसे, दत्ताराम बेलोसे, जगदीश काते, संचित खोपकर व शरद बेलोसे आदींनी हा टेम्पो अडवून मुद्देमालासह पकडून मुरु ड पोलिसांच्या ताब्यात दिला. मुरु ड पोलिसांनी हा टेम्पो जप्त करून यातील तीन लाख ६८ हजार १६५ रु पयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. या टेम्पोतील माल वाहून नेणारे संतोष गोपाळ पाटील, शैलेश अशोक पडवळ या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मोहिते करीत आहेत. काशिद ग्रामस्थांनी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल आभार व्यक्त केले. (वार्ताहर)