पोलिस भरतीत उत्तेजक द्रव्याचे सेवन, रायगड पोलिसांनी केला पर्दाफाश
By निखिल म्हात्रे | Published: January 8, 2023 08:05 PM2023-01-08T20:05:03+5:302023-01-08T20:05:13+5:30
उत्तेजके नव्हे अंगात प्रामाणिकपणा बाणवून पोलिस व्हा- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.
अलिबाग -पोलिस भरती प्रक्रीयेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे उत्तेजके औषधी द्रव्य सापडले. या उमेदवारांचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत. ईर्ष्येपोटी उत्तेजकांचा वापर खेळाडू करतात आणि आपले करीअर बरबाद करतात.
आता पोलिस भरतीतील शारीरिक चाचणीतही उत्तेजकांचा वापर होत असेल तर ती चिंतेची बाब आहे. दरम्यान यातीच एका उमेदवारीची मैदानी चाचणी शनिवारी झाली तर दुसऱ्या उमेदवारीची चाचणी परीरीक्षा आज होणार होती. मात्र त्याची मैदानी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी भरतीत गैरप्रकार सहन करणार नाही, असा इशारा उमेदवारांना दिला आहे.
अलिबाग पोलीस ठाण्यातील पेालीस कर्मचाऱ्यांना गोपनीय सुत्रांकडून वरसोली, नाईक आळी येथील एका कॉटेजमध्ये पोलीस भरती मैदानी चाचणीकरीता आलेल्या काही उमेदवारांकडे औषधीद्रव्ये असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या काॅटेजमध्ये तिघेजण रहात होते. त्यामधील दोघेजण भरती प्रक्रीयेसाठी आले होते. तर त्यातील एक त्यांच्या सोबत आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता एक करड्या रंगाचे चेन असललेल पाकिट मिळून आले.
त्यामध्ये “दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन, नाव नसलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या 44 डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन 32 एनच्या नीडल्स, एक बीडी यू40इन्सुलिन असे नाव असलेली सिरींज नीडलसह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले” अशा प्रकारचे साहित्य मिळुन आले.
याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता मैदानी चाचणीच्या अगोदर या गोळया, औषधे घेतल्यास त्याचा फायदा मैदानी चाचणीसाठी होत असल्याचे सांगितले. या घटनेची चौकशी अलिबाग पोलीस ठाणे करीत असून चौकशीमध्ये पुरावे आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. औषधीद्रव्य व गोळयांचा वापर मैदानी चाचणीच्या पुर्वी केला जात असल्याने सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही व्यक्तींचे जिल्हा सामान्य रूग्णालय, अलिबाग येथील वैदयकीय अधिकारी यांच्याकडुन रक्ताचे नमुने काढुन घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई व नवी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. तुर्तास तिन्ही व्यक्तींना सोडुन देण्यात आलेले असुन त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामधील निष्कर्षांवरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेले कोणतीही वस्तु/पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेला सामोरे न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जे उमेदवार असे गैरप्रकार करताना आढळुन येतील त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.