मुरुड जंजिरा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. सरकारच्या चाललेल्या एककल्ली कारभारामुळे समस्त जनता त्रस्त आहे. याचा फायदा मिळवण्यासाठी मतदारांना आपल्यातला व त्यांच्यातील फरक दाखवून द्या. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते कसे मिळतील यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केले.पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मुरुड येथे आल्या होत्या. त्यावेळी गोल्डन स्वान येथील सभागृहात संपन्न झालेल्या सभेत त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अदिती तटकरे म्हणाल्या की, पदवीधर मतदार संघासाठी शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस व कवाडे गट व अन्य मित्र पक्षांचा पाठिंबा आहे. पदवीधर मतदार हा सुशिक्षित असून त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षांनी केली विकासकामे तसेच भविष्यात सत्ता मिळाल्यानंतर परिवर्तनात्मक योजना या विषयी विशेष माहिती देऊन मतदारांना आकर्षित करा. मतदारांच्या घरापर्यंत पोहचून जास्तीत जास्त मतदान करून घेणे सुद्धा आवश्यक आहे. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे असणारी जागा राष्ट्रवादीने जिंकली. यामध्ये बदल होणार नाही सदरची ही जागा पुन्हा राष्ट्रवादी पक्षच जिंकेल यासाठी कार्यकर्र्त्यांनी मेहनत घ्यावी व विजयश्री खेचून आणूया. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पक्षाला विजय मिळत असतो, असेही त्या यावेळी म्हणाल्या. नजीब मुल्ला हे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच कोकण मर्कंटाईल या बँकेचे चेअरमन सुद्धा आहेत. पदवीधर लोकांची मते मिळवण्यासाठी संपर्क व भेट या दोन गोष्टीवर विशेष लक्ष देण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी या रायगड जिल्ह्याचा खरा विकास आमदार सुनील तटकरे यांनी केला आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आमचे कार्यकर्ते मनापासून काम करून आपला उमेदवार निश्चित विजयी करतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आमच्या तालुक्याला विकास निधी सुद्धा दिला गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
लोकांशी संपर्क व भेटी वाढवायला हव्या - अदिती तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:39 AM