जेएनपीटीच्या 'सीएफएस'मध्ये जप्त केलेले कंटेनर धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:15 AM2020-10-16T00:15:47+5:302020-10-16T00:15:54+5:30
काही कंपन्या कंटेनरमधून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तस्करीच्या मालाची आयात-निर्यात करतात.
उरण : सीमा शुल्क विभागाच्या विविध विभागांकडून संशयित किंवा तस्करीच्या कामासाठी वापरलेले अथवा बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन आयात-निर्यातीच्या प्रकरणात कारवाईअंती जप्त करण्यात येतात. सीएफएसमध्ये असे शेकडो संशयित कंटेनर अनेक वर्षांपासून जेएनपीटीच्या स्पीडी कंटेनर यार्डमध्ये धूळखात पडून असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.
जेएनपीटी बंदर सध्या आंतरराष्ट्रीय माफियांचा अड्डा बनला आहे. सोने, रक्तचंदन, अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. डीआरए, सीमा शुल्क विभागाच्या विविध विभागांकडून विविध प्रकारच्या तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर जप्त केले जातात. उरण परिसरातील कोणत्याही कंटेनर यार्डमध्ये तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर येथील जेएनपीटीच्या सीएफएमध्ये आणले जातात.
काही कंपन्या कंटेनरमधून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तस्करीच्या मालाची आयात-निर्यात करतात. अशा चोरट्या मालाची आयात-निर्यात करताना तस्करीत सहभागी असलेल्या कंपन्या आपले बिंग फुटले जाऊ नये यासाठी बनावट कंपन्यांंच्या नावाचाही वापर करतात. आयात-निर्यातीच्या बेनामी तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेले कंटेनर बेवारस म्हणून घोषित केले जातात. आयात करण्यात आलेला माल ने-आण करताना खराब झालेला असतो. अशा प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मालक कंटेनर ताब्यात न घेता तसेच सोडून देतात. परिणामी, असे शेकडो कंटेनर येथील सीएफएस ठेवण्यात येतात. सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात असलेल्या अशा कंटेनरची संख्या सध्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जेएनपीटी परिसरात तस्करीच्या प्रमाणात वाढ होत चालली असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.