- जयंत धुळप, अलिबाग
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे निसर्गप्रेमी राऊंड आॅफिसर हरिश्चंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी १० ते १२ वनमजूर आणि काही निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या ४ जानेवारी रोजी ११७, ५ जानेवारी रोजी १३०, तर १२ जानेवारी रोजी १२० अशी एकूण ३६७ सागरी कासवाची अंडी यंदाच्या विणीच्या हंगामात दिवेआगर समुद्रकिनारा परिसरात शोधून काढण्यात या चमूला यश आले आहे. भारतात सागरी कासवांची एकूण ५ कुळे व ३१ जाती आढळतात. यापैकी ‘उर्मोचिलिड’ व ‘चिलोनिडी’ या कुळांमध्ये कातडी कवचांच्या सागरी कासवाचा समावेश होतो. भारतामध्ये त्याची लेदरबॅक ही एकमेव जात सापडते. तर चिलोनिडी कुळामध्ये भारतीय समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या आॅलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉकिबल, लॉगर हेड या चार जातींचा समावेश होतो. २००२मध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे सर्वेक्षणात आॅलिव्ह रिडले ही प्रजाती विणीसाठी येत असल्याचे आढळून आले होते.किनाऱ्यावर आढळणाऱ्या कासवांची अंडी पळविणे, मांसाचा वापर अन्नपदार्थ म्हणून करणे, तसेच कुत्रे, कोल्हे, तरस, डुक्कर हे प्राणीसुद्धा कासवाचीअंडी खातात. तेल काढण्यासाठी व कासवाच्या कवचापासून शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठीही कासवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. शिवाय मच्छीमारांच्या जाळ्यात अडकणे किंवा वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने अशा अनेक कारणांमुळे समुद्रीकासवांचे जीवन धोक्यात आले आहे. ३५ ते ४० हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात यशस्थानिक ग्रामस्थांमध्ये कासवाचे महत्त्व, सागरी कासव नष्ट झाला तर समुद्राची होणारी हानी याविषयी जनजागृती केली. किनारपट्टीवरील १५ ते २० ठिकाणी कासवांच्या अंड्यांसाठी ६०० ते ७०० घरटी तयार केली जातात. गेल्या १० ते १२ वर्षांत कार्यकर्ते, पर्यटकांनी ३५ ते ४० हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात यश मिळविले आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एखादी चळवळ सुरू व्हावी आणि ती चळवळ वन विभागाने अखंडित सुरू ठेवावी, याचे हे देशातील एक आगळे उदाहरणच म्हणावे लागेल.संरक्षण मोहिमेला चळवळीचे रूप : भाऊ काटदरे, जयंत कानडे, विजय महाबळ, राम मोने आदीं पर्यावरणप्रेमींनी १९९२मध्ये चिपळूणला निसर्ग संवर्धन व संशोधनासाठी ‘सह्याद्री निसर्गमित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. सागरी कासवांचे संवर्धन झाले पाहिजे, त्यासाठी किनारीभागात चळवळ उभी केली. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत कासवे किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात आणि पिल्ले बाहेर येण्याची वाट न पाहता निघून जात असल्याचे आढळून आले.- 2002मध्ये मंडळाने सागरी कासव संरक्षण मोहीम सुरू केली. वेळास सागरीकिनारी पहिल्या वर्षी कार्यकर्त्यांना कासवांनी ५० अंडी घातल्याचे लक्षात आले. या अंड्यांमधून बाहेर पडलेली पिल्ले समुद्रात सोडण्याचा आनंद लुटला. महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर सागरी कासव संरक्षण मोहीम सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, अंजर्ला, दाभोळ, कोळथोर, मुरूड, रायगड जिल्ह्यात दिवेआगार, मारळ हरिहरेश्वर आदी १५ ते २० ठिकाणी कासव संरक्षण मोहिमेचे तंबू निर्माण करण्यात यश मिळविले. या ठिकाणी कासवांनी अंडी घातल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी कम्पाऊंड तयार केली.