- संजय कारंडेमुरुड जंजिरा - संघटनांमधील वादामुळे जंजिरामधील शिडाच्या बोटीची वाहतूक १५ दिवसांपासून ठप्प होती. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. पर्यटकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. समुद्रामधील हा किल्ला अजिंक्य समजला जात होता. किल्ल्याची अभेद्य तटबंदी, समुद्रात असूनही किल्ल्यावर असणारे गोड्या पाण्याचे तलाव यामुळे पर्यटकांची पसंती या ठिकाणाला मिळत असते. जंजिरावरून किल्ल्याकडे जाण्यासाठी शिडाच्या बोटीचा उपयोग करावा लागतो. वेलकम सोसायटी व जंजिरा पर्यटक सोसायटीच्या वादामुळे मागील १५ दिवसांपासून शिडाच्या बोटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. कोणाच्या किती बोटी किल्ल्यावर सोडायच्या, यावरून मतभेद निर्माण झाले होते. यावर तोडगा निघत नसल्याने तब्बल १५ दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. परीक्षा संपत आल्याने जंजिरा पाहण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या वाढत असून, शिडाच्या बोटींची वाहतूक बंद असल्याने पर्यटकांना निराश होऊन परत जावे लागत होते. अनेक पर्यटकांनीही वाहतूक पूर्ववत सुरू व्हावी, अशी मागणी केली होती. अखेर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर जाण्यास खूप मज्जा वाटते. बोटी सुरू झाल्याने अनेक पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे.संघटनांनी आपापसात समन्वय साधावादोन्ही संघटनांच्या वादाची दखल महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डानेही घेतली आहे. दोन्ही संघटनांनी आपापसात समन्वय साधून, कोणालाही त्रास होणार नाही, अशाप्रकारे व्यवसाय करावा, असे परखड मत व्यक्त केले आहे. शिडांच्या बोटी सुरू झालेल्या असल्या तरी वेलकम सोसायटी व जंजिरा पर्यटक सोसायटीची सयुंक्तिक सभा मेरी टाइम बोर्डाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यामध्ये कोणाच्या किती बोटी किल्ल्यावर सोडायच्या, हे प्रमाण दोन्ही संघटनांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येणार असल्याची माहिती कॅप्टन सूरज नाईक यांनी दिली आहे. ही बैठक १७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. जंजिरा पर्यटक सोसायटीचे व्यवस्थापक नाझभाई कादरी यांनी शिडाच्या बोटी सुरू केल्याबद्दल स्थानिक आमदार पंडित पाटील व कॅप्टन सूरज नाईक यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.किल्ला पाहाण्यासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. मेरी टाइम बोर्डाचे राजपुरी येथील वाहनतळ चारचाकी गाड्यांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. नाशिक, सोलापूर, नागपूर, यवतमाळ, ठाणे, मुंबई येथील पर्यटकांनी हा किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
शिडाच्या बोटीची वाहतूक पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:57 AM