चीनमधून प्रतिबंधित वस्तूंची ‘जेएनपीए’मार्गे होतेय तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:02 AM2024-05-11T09:02:58+5:302024-05-11T09:03:06+5:30

१२२ संशयास्पद  कंटेनर जप्त : सीमा शुल्क विभागाची कारवाई

Contraband goods are being smuggled from China through 'JNPA' | चीनमधून प्रतिबंधित वस्तूंची ‘जेएनपीए’मार्गे होतेय तस्करी

चीनमधून प्रतिबंधित वस्तूंची ‘जेएनपीए’मार्गे होतेय तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : ‘जेएनसीए’च्या कस्टम सेंट्रल इंटेलिजन्स युनिटने बंदी घातलेले चिनी फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोचिप आणि इतर प्रतिबंधित पदार्थ असल्याच्या संशयावरून १२२ कंटेनर रोखून ठेवले आहेत. हे संशयित कंटेनर बनावट मालाच्या नावाने जेएनपीए बंदरात आणले असल्याचे सांगितले जात आहे.

उरण परिसरातील पंजाब कॉनवेअर गोदामात आलेल्या अनेक कंटेनरची तपासणी केली असता कस्टमला या कंटेनरची माहिती मिळाली होती. कर चुकवून बनावट मालाच्या नावाने व तस्करीच्या मार्गाने बंदी घातलेले चिनी फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोचिप आणि इतर प्रतिबंधित पदार्थ भरलेले हे सर्व संशयित १२२ कंटेनर एकाच जहाजातून जेएनपीए बंदरात आणले आहेत. 

सीसीटीव्हीच्या निगराणीत कंटेनर 
सीमाशुल्क विभागाने या कारवाईबाबत अद्यापही अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. अधिकाऱ्यांना या कंटेनरशी संबंधित गोपनीय माहिती मिळाली आहे. ज्याचा खुलासा करता येणार नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत १२२ संशयित कंटेनर सीसीटीव्ही व अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

तपासणीत काही कंटेनर साफ केल्याचे उघड
n तपासणीत काही कंटेनर साफ केले गेले असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे सीआययूने  परिसरातील कंटेनर फ्रेट स्टेशन्स आणि कंटेनर टर्मिनल्सच्या सर्व व्यवस्थापकांना ई मेलद्वारे नोंदींची बिले, मूल्यांकन आणि कंटेनरची स्थिती यांसह कंटेनरचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 
n रेड-लीड आणि लिथियमसारखी विषारी रसायने असलेल्या खराब गुणवत्तेच्या विदेशी फटाक्यांचा ओघ रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही  चीनमधून भारतात  प्रतिबंधित फटाक्यांच्या निषिद्ध मालाची तस्करी होत असल्याचा संशय आहे.

Web Title: Contraband goods are being smuggled from China through 'JNPA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.