घनकचऱ्यासह नाल्यातील गाळही डम्पिंगवर ठेकेदाराचे साटेलोटे; शिवसेनेची महापालिकेकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:24 PM2020-01-13T23:24:44+5:302020-01-13T23:25:03+5:30
सिडकोने कळंबोली वसाहतीतील पावसाळी नाल्यांमधील कचरा, गाळ काढण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे.
कळंबोली : सिडकोने पनवेल परिसरासोबत कळंबोली नोड हस्तांतर करण्यापूर्वी आठ कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये पावसाळी गटार यांचाही समावेश आहे. गटारांमधून काढलेली माती सिडकोच्या ठेकेदाराने उचलायला हवी होती. मात्र, ती पनवेल महापालिकेच्या ठेकेदाराने उचलण्यास सुरुवात केली.
पनवेल महापालिका, घनकचरा उचलण्याचे आणि तो डम्पिंग ग्राउंडवर वाहतुकीसाठी ठेकेदाराला टनाप्रमाणे पैसे देते. जितके जास्त वजन तितके जास्त पैसे ठेकेदाराला दिले जातात, त्यामुळे जास्त वजन भरावे म्हणून अनेक पर्याय स्वीकारले जात आहेत. कचºयामध्ये माती आणि डेब्रिज मिसळून वजन वाढवण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत. यामध्ये सिडको आणि महापालिकेच्या ठेकेदाराबरोबरच अधिकाऱ्यांचेही साटेलोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केला आहे. तर याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे निकम यांनी सांगितले. याआधी कचरा उचलण्याचे काम सिडकोने महापालिकेकडे सोपविले आहे. घनकचरा व्यवस्थापन मनपाचे आरोग्य विभाग करीत आहे. यासाठी साई गणेश हा ठेकेदार नेमलेला आहे. मात्र, कचरा उचलणारा ठेकेदार नियमाचे पालन करीत नाही. बुधवारी तर महापालिकेच्या कचरा उचलण्यासाठी असलेल्या गाडीमध्ये कळंबोली पोलीस ठाण्यासमोरील नाल्यातून काढण्यात आलेली माती टाकण्यात आली. निम्म्याहून जास्त डम्पर मातीने भरल्यानंतर तो कळंबोली कातकरवाडीतील कचºयाच्या ढिगाकडे नेण्यात आल्याचे शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे.
सिडकोने कळंबोली वसाहतीतील पावसाळी नाल्यांमधील कचरा, गाळ काढण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. त्यात त्याने माती आणि कचरा बाहेर काढून ढीग लावले आहेत. ही माती उचलण्याचे काम संबंधित ठेकेदाराचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी पनवेल महापालिकेचे कामगारच ही माती उचलत असल्याचे बुधवारी उघडकीस आले. त्यामध्ये कचरा मिसळून महापालिकेकडून पैसे उकळले जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
आमच्याकडे मनुष्यबळ नाही, असे पनवेल महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मग सिडकोने काढलेली माती उचलण्याकरिता महापालिकेकडे माणसे आली कुठून? जे काम सिडकोचे आहे, ते महापालिकेचा ठेकेदार का करतो? या मागे काहीतरी गौडबंगाल आहे, असा शिवसेनेचा स्पष्ट आरोप आहे. याबाबत योग्य चौकशीसाठी आयुक्तांकडे तक्रारही करण्यात येणार आहे. - दीपक निकम, पनवेल विधानसभा संघटक, शिवसेना