ई-टोकनच्या माध्यमातून सवडीनुसार सीएनजी भरण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:39 AM2018-12-12T00:39:14+5:302018-12-12T00:39:31+5:30
सध्या मुंबई व परिसरातील सीएनजी स्टेशनवर रिक्षा व टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लावावी लागते.
मुंबई : सध्या मुंबई व परिसरातील सीएनजी स्टेशनवर रिक्षा व टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लावावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सीएनजी स्टेशनवर रिक्षा व टॅक्सीचालकांनी जाण्यापूर्वी ई-टोकन पद्धतीचा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सीएनजी स्टेशनवरील रांग कमी होण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.
सीएनजी भरण्यासाठी सध्या मोठी रांग लागत असल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना बहुमूल्य वेळ यासाठी गमवावा लागतो. नवीन पद्धतीनुसार अॅपच्या माध्यमातून वाहनचालकांनी आपले लोकेशन शेअर करून संबंधित सीएनजी स्टेशनवर सीएनजी भरण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त करण्याची गरज आहे. त्यानंतर सीएनजी स्टेशनतर्फे संबंधित वाहनचालकांना संभाव्य वेळ दिली जाईल व त्याद्वारे आगाऊ वेळ नोंदवून त्यांना कधी यायचे हे कळवले जाईल. त्यामुळे वाहनचालक त्यांना दिलेल्या वेळी आल्यावर त्यांना रांग न लावता थेट सीएनजी भरण्यासाठी संधी दिली जाईल. सध्या ताडदेव, शीव व देवनार या तीन ठिकाणी सीएनजी स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जात आहे. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील सर्व २२४ सीएनजी स्थानकांवर ही योजना राबविण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला़