प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:59 AM2019-05-06T01:59:13+5:302019-05-06T01:59:43+5:30
रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे.
उरण - रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे किनारी परिसरात आढळणाऱ्या माशांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना मत्स्य दुष्काळाची चिंता भेडसावत आहे.
रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये करंजा, मोरा हा परिसर पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र काही मंडळींनी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ धरून मासेमारी व्यवसायात वृद्धी केली आहे. यासाठी उरण दिघोडे गावात मत्स्यप्रक्रि येबाबत सहकारी कारखानाही सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणाहून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर राज्यांतही निर्यात केली जाते; परंतु गेल्या काही वर्षात या व्यवसायात अडचणी उद्भवू लागल्या आहेत. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर संकट ओढावले आहे. किनाºयालगत तसेच खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे.
‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ फिशरीज एज्युकेशन’ या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील १२५ माशांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त ७८ जाती शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षात पर्ससीन जाळ्यांचा वापर तसेच एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यात वाढ झाली आहे. यामुळे मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असली तरी सागरी प्रदूषणही वाढले आहे.
पनवेल कोळीवाडा हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळबाधित झाले. तर माजगाव, मुरु ड, नांदगाव, राजापुरी दिघी, तुरूंबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोरली ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीटीबाधित गव्हाण हनुमान कोळीवाडा, पाणजे गाव, कारंजा इन्फ्रा प्रोजेक्टमुळे बाधित करंजा गाव व सात पाडे या समुद्रकिनाºयावरील खाडीलगतच्या परिसर प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी मच्छीमारांवर उपासमारीचे सावट पसरले आहे.
खारफुटीची कत्तल संवर्धनात अडचणी
डिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरु स्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, नवे प्रकल्प व येणाºया कोस्टल रोडमुळे खारफुटीची बेसुमार कत्तल होत असल्याने मत्स्य संवर्धनात अडचणी येत आहेत.