नागोठणे : कोणत्याही आंदोलनात कोणत्याही मंत्र्याबरोबर चर्चेला बसत नाही, पण ज्यांच्या बरोबर बसतो तेव्हा यशस्वी निर्णय घेऊनच बाहेर पडतो. येथील रिलायन्समध्ये किती कामगार संघटना आहेत व आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी त्या न्यायालयात गेल्या आहेत का, हे मला माहीत नाही. मात्र आपल्या मागण्यांसाठी सर्व संघटना एकत्र होण्यासाठी कामगारांची साथ असणे गरजेचे असून, त्यांची साथ नसेल तर काहीही साध्य होत नाही, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे -पाटील यांनी मांडले.रिलायन्स कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आ. भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सदस्य असलेल्या कामगार संघटनेने शुक्र वारपासून कुहिरे येथे धरणे आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी कोळसे-पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. या सभेला महासंघाचे उपाध्यक्ष सदाभाई चव्हाण, पाताळगंगा रिलायन्सचे कामगार नेते श्रीनिवास पत्की, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष उमेश ठाकूर, कामगार नेते उद्धव कुथे, संघटनेचे युनिट अध्यक्ष शशांक हिरे, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे आदी मान्यवरांसह शेकडो कामगार उपस्थित होते. डी. ए. तीन वर्षे गठित करता येत नसला तरी येथील रिलायन्स कंपनीत तो केला गेला आहे. अंबानी सध्या पंतप्रधानांचीच भूमिका बजावत आहेत. सर्व संघटना एकत्र येत नसल्यामुळेच कामगारांवर अन्याय केला जात असल्याचे मला दिसून येत होते. न्यायहक्कांसाठी एकजूट करा, अन्याय सहन करणे बंद करा. तुम्ही एकत्र या, पन्नास वकील तुमच्या पाठीशी उभे करतो. मीसुद्धा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आंदोलनाची वेळ आली तर जेलमध्ये जाणारा मी प्रथम असेन, असे उद्गारही यावेळी त्यांनी काढले. यावेळी अनेक कामगार नेत्यांची भाषणे झाली. (वार्ताहर)
न्यायहक्कांसाठी कामगारांची साथ मोलाची
By admin | Published: October 25, 2015 12:21 AM