महायुतीचा १४ जानेवारी रोजी अलिबागेत समन्वय मेळावा
By राजेश भोस्तेकर | Published: January 11, 2024 02:27 PM2024-01-11T14:27:11+5:302024-01-11T14:27:34+5:30
तीनही पक्षाच्या नेत्यांनी केली मैदानाची पाहणी.
अलिबाग : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्र सरकारातील महायुतीचे तीनही पक्ष आता निवडणुकीच्या मोडमध्ये आले आहेत. या अनुषंगाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे युतीच्या तीन पक्षात समन्वय बैठकाचा सिलसिला सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात रविवारी १४ जानेवारी रोजी अलिबाग येथे समुद्रकिनारी जे एस एम महाविद्यालय मैदानावर महायुती आणि मित्र पक्ष यांचा समन्वय मेळावा होणार आहे. त्या अनुषंगाने तीनही पक्षाच्या समन्वयकानी गुरुवारी ११ जानेवारी रोजी मैदानाची पाहणी केली.
शिवसेना आमदार महेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे समन्वयक विक्रांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड महेश मोहिते यासह युतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मैदानाची पाहणी केल्यानंतर समनव्यक यांच्यात मेळाव्याच्या अनुषंगाने तुषार विश्रामगृह येथे बैठक पार पडली.
राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष असे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महायुती पक्ष आणि मित्र पक्ष यांच्यात समन्वय राहण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी समन्वय मेळावे होणार आहेत. १४ जानेवारी रोजी अलिबाग येथे जे एस एम महाविद्यालय मैदानावर जिल्ह्यातील युतीचे आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत समन्वय मेळावा होणार आहे. त्यादृष्टीने समन्वयक हे कामाला लागले आहेत अशी माहिती भाजपचे समन्वयक विक्रांत पाटील यांनी दिली आहे.