पोलिस बनले मेकॅनिक; प्रवास निर्विघ्न; गणेशोत्सव काळात रायगड पोलिसांनी चाकरमान्यांची कोंडीतून केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 07:12 AM2024-09-16T07:12:16+5:302024-09-16T07:12:59+5:30
चोख नियोजन केले होते.बंदोबस्तासह सुविधा केंद्रे उभारली होती. गणेशोत्सवात त्यांनी गणेशभक्तांना अहाेरात्र सेवा दिली.
अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी अहाेरात्र पहारा दिला. वेळप्रसंगी त्यांनी बंद पडलेल्या वाहनांचीही दुरुस्ती केली.
या काळात शंभर वाहनांची दुरुस्ती किंवा त्यांची स्टेपनी बदलण्याचे काम पोलिसांनी केले. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा प्रवास विनाअडथळा निर्विघ्न होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला होता. त्यासाठी चोख नियोजन केले होते.बंदोबस्तासह सुविधा केंद्रे उभारली होती. गणेशोत्सवात त्यांनी गणेशभक्तांना अहाेरात्र सेवा दिली.
१५ दिवसांपासून तत्पर पेण ते महाडदरम्यानच्या रस्त्यात होणाऱ्या पंक्चर गाड्यांना तत्काळ स्टेपनी बदलण्यासाठी स्वत: पोलिस कर्मचारी वाहनचालकाला मदत करीत होते. तर काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीच्या सहाय्याने बंद पडलेल्या चारचाकी, तीनचाकीसह दुचाकीचे काम केले. मागील १५ दिवसांपासून रायगड पोलिसांनी चांगली सुविधा दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
बंदोबस्तासाठी असताना गणेशभक्तांची वाहने पंक्चर होत होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. ती टाळण्यासाठी आम्ही स्वत: मेकॅनिक बनून स्टेपनी बदलण्याची कामे केली. त्यामुळे गणेशभक्त देत असलेले आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे होते.
- राजेंद्र गाणार, हवालदार
गणेशोत्सावादरम्यान काही पोलिस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतींचे दर्शनही घेता आले नाही. मात्र, नागरिकांची सेवा करणे, हाच गणेशाचा मोठा आशीर्वाद
असल्याचे सांगत होते. स्वत: एक अधिकारी म्हणून जेव्हा भक्तांची मदत करीत असतानाच आम्हाला मदत केलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंदात बाप्पाचे दर्शन होत होते.
- सोमनाथ लांडे, वाहतूक पोलिस निरीक्षक
भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी गणेशोत्सवापूर्वीच संपूर्ण नियोजन केले होते. या नियोजनासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रोल महत्त्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी आपल्या ड्यूटीव्यतिरिक्त गणेशभक्तांना केलेली मदत वाखाणण्याजोगी आहे. तर परतणाऱ्या गणेशभक्तींनी ही पोलिसांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक