पाण्यासाठी टँकरभोवती गराडा, एक ते दोन हंड्यांच्या पाण्यावर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:53 AM2019-06-09T01:53:39+5:302019-06-09T01:54:17+5:30
केंबुर्ली गावात भीषण पाणीटंचाई । एक ते दोन हंड्यांच्या पाण्यावर समाधान
सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा गावांना महाड पंचायत समितीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत गावांना होणारा पाणीपुरवठा हा अपुरा पडत आहे. महाड तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या केंबुर्ली गावाला भीषण पाणीटंचाईची झळ बसली आहे. गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, गावात टँकर शिरताच महिलांचा त्याच्याभोवती पाण्यासाठी गराडा पडतो.
महाड तालुक्यातील केंबुर्ली गावात गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. या गावात फक्त दोनच विहिरी असून, गावासाठी येणारी नळ पाणीपुरवठा योजनादेखील कधीच ठप्प झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिलासा म्हणून महाड पंचायत समितीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला जास्त पाणी मिळावे याकरिता टँकर गावात येताच त्याच्यामागे धावपळ करताना दिसतो.
गेल्या अनेक वर्षांपासून केंबुर्ली गावाला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी तो अपुरा आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची, या ठिकाणी जलसंधारणाची, सिंचनाची कामे होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे स्थानिक सांगतात.