कोर्लईचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:49 AM2018-04-16T06:49:07+5:302018-04-16T06:49:07+5:30
मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- अमूलकुमार जैन
बोर्ली मांडला - मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुंडलिका नदीच्या दक्षिणेला कोर्लई गावाजवळ १५२१मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोर्लई किल्ला बांधला. १५९४मध्ये पोर्तुगिजांकडे गेलेला हा किल्ला पेशवाईच्या काळात चिमाजी आप्पा यांच्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. जवळपास पाच शतकांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यावरील शंकराच्या देवळाची पडझड झाली आहे. तोफा अस्ताव्यस्त पडल्या आहेत.
किल्ल्यावर पाण्याची विहीर असून, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तटबंदी ढासळू लागली आहे. पोर्तुगिजांनी लावलेला फलकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी किल्ल्यावर लागलेल्या आगीमध्ये वनसंपदा नष्ट झाली आहे. पुन्हा वृक्षारोपण करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.
कोर्लई किल्ला पुरातत्त्व व वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. पुरातत्त्व विभागाने येथील पुरातन चर्चचे नूतनीकरण करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यासाठी सुरू केलेले काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात; परंतु किल्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करत आहेत. पुरातत्त्व विभागाने किल्ला संवर्धनासाठी ठोस प्रयत्न सुरू करावेत, अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.