रातोरात उभे राहिला कोपरा पुल; दहा वर्षाचा प्रश्न एका रात्रीत सुटला
By वैभव गायकर | Published: April 14, 2023 07:51 PM2023-04-14T19:51:12+5:302023-04-14T19:51:30+5:30
या सोहळ्याला 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो
वैभव गायकर
पनवेल - प्रशासनाने ठरवले तर काहीही होऊ शकत हे खारघर मध्ये पहावयास मिळाले आहे.मागील दहा वर्षात जे झाले नाही ते रातोरात सिडकोने प्रशासनाने करून दाखवले आहे.दि.16 रोजी खारघर शहरात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा रंगणार आहे.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.यावेळी सोहळ्याला राज्यातील मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाची तत्परता पहावयास मिळत आहे.
या सोहळ्याला 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या भावनेने सिडकोने रात्रभर तात्पुरत्या स्वरूपाचे पूल उभारले आहे.खारघर मधून सायनपनवेल हायवेला बाहेर पडता यावं म्हणून कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आहे. कोपरा पुलाजवळील वाहतूक कोंडी कित्येक वर्षाचा प्रश्न बिकट बनला आहे.याठिकाणी पर्यायी मार्ग सुरु करा म्हणुन माजी नगरसेवक प्रवीण पाटील,मनसेचे गणेश बनकर,शिवसेनेचे मनेश पाटील,माजी नगरसेवक नरेश ठाकुर,माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला.सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत निवेदन सादर केली.मात्र सिडकोने ते मनावर घेतले नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपुर्ण राज्यातील मंत्रिमंडळ खारघर शहरात दाखल होणार असल्याने रातोरात शहरात विकासकांना गती आली आहे.शहराला एक वेगळीच झळाळी मिळत आहे.कित्येक वर्षांपासून रखडलेला कोपरा पूल हे देखील याचे उत्तम उदाहरण आहे.