हलगर्जीमुळे म्हसळ्यात कोरोनाबाधितांमध्ये वाढ;बाजारपेठेत नियमांना हरताळ फासत नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:55 AM2020-05-29T00:55:25+5:302020-05-29T00:55:37+5:30
गुरुवारी एक पॉझिटिव्ह
म्हसळा : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांत रोज वाढ होत आहे. २८ मे रोजी तालुक्यातील ठाकरोली अनंतवाडी येथील ठाण्याहून मोटारसायकलवरून आलेला तरुण कावीळवर उपचार घेण्यासाठी आपल्या पत्नीसह आल्याचे समजते. त्याला कोरोनाची बाधा झाली आहे.
आतापर्यंत म्हसळा तालुक्यात सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला. मात्र अनेक जणांना होम क्वारंटाइन के लेले असताना बाहेर फिरत असल्याने धोका वाढला आहे. त्यातच म्हसळा बाजारपेठेत नागरिक प्रचंड गर्दी करत आहेत. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
म्हसळा तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत सुमारे १३,४०० चाकरमानी आले असून त्यातील बहुतांश मंडळी क्वारंटाइन झाली होती. तळवडे ग्रामपंचायतीच्या गाव-वाड्यांवर ३९६ तर पाभरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ५५६ स्थलांतरित आले आहेत. क्वारंटाइनच्या वेळी अनेक जण आपल्या गावात व शहरांत मनमुराद फिरताना दिसत आहेत. यामुळे तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, आवश्यक ते शारीरिक अंतर ठेवावे, गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, दुकानातील प्रत्येक ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर असणे आवश्यक राहील.
याव्यतिरिक्त एका दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित सर्व दुकानदार व ग्राहकानी घेणे बंधनकारक आहे. असे शासनामार्फत सांगण्यात येते. मात्र म्हसळा बाजारपठेत गर्दी करून या नियमांना हरताळ फासला जात आहे. याचबरोबर स्वत:सह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणले जात आहे.