कोरोना नियम मोडणारे प्रशासनाच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:10 PM2021-04-29T23:10:42+5:302021-04-29T23:10:51+5:30
विनामास्क फिरणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन, पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा बडगा
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होण्यास गर्दी आणि विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांचा बेजबाबदारपणा समोर येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क लावण्याचा पर्याय उत्तम असल्याचे शासन सांगत असतानाही बेफिकीरपणाने विनामास्क गावभर फिरणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाने १४ हजारांहून अधिक नागरिकांवर कारवाई केली आहे. कोरोना उपाययोजनांसाठी शासनाने जरी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून प्रशासनाने ४४ लाख १६ हजार ७८७ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
आपल्याला काय होतंय अशा अविर्भावात नागरिकांनी दुसऱ्या कोरोनाच्या लाटेला नजरअंदाज केले. परिणामी, कोरोनाने रायगड जिल्ह्याला विळखा दिला आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी आहे. उलटपक्षी रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये असणारा सुशिक्षित वर्ग शासनाने कोरोना रोखण्यासाठी लावलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. शहरांमधील बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करताना दिसत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. असे असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना चाप बसविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी पथके नेमली आहेत. या पथकांनी जिल्ह्यातील १७ जिमखाना क्लब, नाइट क्लब, २५ विवाह सोहळे, ३१ रेस्टॉरंट, २ सिनेमागृहे, ४० शॉपिंग मॉल, ६० धार्मिक स्थळे, ६ कोचिंग क्लासेस, १६७ सार्वजनिक स्थळे, २६ खासगी कार्यालये अशा एकूण ३७४ ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली आहे. यामध्ये २१ शॉपिंग मॉलमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले असून, यापैकी ११ शॉपिंग मोलवार १५ हजार रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. १८ सार्वजनिक स्थानावर नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनात आले असून, ११ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ४ खासगी कार्यालयांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने या कार्यालयांना ८०० रुपयांचा दंड आकारला आहे.
रायगड जिल्ह्यात २१ फेब्रुवारी पासून २४ एप्रिल पर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी दंडात्मक कारवाईचा बडगा नागरिकांवर उगारला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाने नेमलेल्या पथकांनी ४२ हजार ३४४ ठिकाणी भेटी दिल्या आहेत. यामध्ये २ हजार ९३७ ठिकाणी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ५७५ नागरिकांकडून प्रशासनाने १२ लाख २६ हजार ८३९ रुपयांचा दंड वसूल केला आहे.