कोरोनामुळे बुरुड व्यावसायिक हवालदिल, तयार वस्तूंची विक्री न झाल्याने अडचण; आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:05 AM2020-05-11T02:05:36+5:302020-05-11T02:06:05+5:30
कोरोनामुळे सर्व जगभर महामारीचे संकट घोंघावत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- अभय पाटील
बोर्ली पंचतन : बांबूच्या काठीपासून विविध साहित्य तयार करणाऱ्या बुरुड व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. साहित्य तयार असून विक्री होऊ शकत नाही, वाहतूक बंद असल्यामुळे बांबू आणू शकत नाही, डोक्यावर कर्ज, कुटुंबाचा गाडा चालवायचा तरी कसा, यामुळे बुरुड व्यावसायिक पूर्णत: हतबल झाले आहेत. शासनाने लक्ष पुरवावे व आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी या व्यावसायिकांकडून
होत आहे.
कोरोनामुळे सर्व जगभर महामारीचे संकट घोंघावत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या टोपल्या, सूप आदी वस्तू तयार करणारा बुरुड समाज होय. जुन्या काळातील गावगाड्यातील हा समाज आहे. श्रीवर्धनमध्ये शेकडो घरे आहेत. आजही मूळ व्यवसाय करून हे आपले जीवन जगत आहे. आजही समाजातील ९० टक्के लोक हाच पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. दुसरा व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच आहे. या समाजातील अनेक लोक बांबू विक्रीचा व्यापार करतात. गेल्या काही वर्षांपासून बुरुड व्यवसाय टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहेत. त्यात प्लास्टिक सूप, टोपल्या आल्या आहेत. त्यात महिलांचा ओढा या वस्तूंकडे वाढला आहे. त्यामुळे हा व्यवसाय टिकविण्याचे आव्हान या समाजासमोर आहे.
सध्या कोरोनामुळे आमच्या समाजाचा पारंपरिक व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. आमच्या समाजातील बहुतांश कुटुंबे हा व्यवसाय करत आहेत. सूप, टोपली, रोवळी, असे विविध साहित्य तयार असूनदेखील ग्राहक येणे बंद आहे सद्य:स्थितीला आमच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आमच्या व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी. - संजय नागे, अध्यक्ष, बुरुड समाज, बोर्ली पंचतन
व्यवसायावरच चालतो कुटुंबाचा चरितार्थ
फेरी करून व्यवसाय चालू होता. ग्राहक त्यांना आवश्यक असणाºया वस्तू आणण्यासाठी येत होते; परंतु लॉकडाउनमुळे फेरी बंद व कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने ग्राहक फिरकेना, लग्नसोहळे रद्द झाले, बांबू आणण्यासाठी गाड्या बंद, तयार असेलेले साहित्य तसेच धूळखात पडून त्यामुळे हातावर पोट असणाºया या बुरुड व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावे, हा प्रश्न आहे.
या समाजातील निराधार महिला देखील आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हा व्यवसाय करतात. या कोरोनामुळे एक वेळची भाकरी मुलांना कशी द्यावी हा प्रश्न भेडसावत आहे. शासनाने शेतकºयांना मदत जाहीर केली आहे यामध्ये बुरुड व्यावसायिकांनाही आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.