कोरोनाचा खर्च : पनवेल महापालिकेने खर्च केले ९ कोटी ८७ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:42 AM2020-08-31T00:42:11+5:302020-08-31T00:42:40+5:30
नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून ही माहिती मिळवली आहे.
पनवेल : पनवेल महानगरपालिका कोविड विरोधात लढा देत असून, पालिकेने याकरिता सुमारे ९ कोटी ८७ लाख रुपये केल्याची माहिती,
माहिती अधिकारात उघड झाली आहे.
नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून ही माहिती मिळवली आहे. पनवेल महानगरपालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत, तसेच आमदार, खासदार व महापौर निधीच्या माध्यमातून ९ कोटी ८३ लाख निधी प्राप्त झाला आहे. यापैकी ३ कोटी ५५ लाख जिल्हाधिकारी कार्यालय, ५ कोटी ४५ लाख राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ७५ लाख आमदार व खासदार निधीतून प्राप्त झाले आहे. उर्वरित साडेसात लाख रुपये महापौर निधीतून प्राप्त झाले आहेत. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आजतागायत ४ लाखांपर्यंत निधी खर्च केल्याची माहिती प्रशासनाने म्हात्रे यांना दिली आहे. अद्याप साथ पूर्णपणे नियंत्रणात आली नसल्याने प्रशासनाला आणखी निधी खर्च करावा लागणार आहे.
कोविडसाठी पनवेल पालिकेला विशेष निधी राज्य शासनाकडून प्राप्त झालेला नसल्याचे पालिकेच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. शासनाच्या नगरोत्थान महाअभियानांतर्गतही पालिकेला निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती नगरसेविका वृषाली वाघमारे यांना पालिकेने दिली आहे.
सीएसआरमधून निधी नाही
पनवेल परिसरात मोठमोठे कारखाने, आद्योगिक कंपन्यांचे जाळे पसरले आहे. कोरोडोची उलाढाल असतानाही या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पालिकेला निधी मिळाला नाही.