नारळी पौर्णिमा सणावर कोरोना महामारीचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 11:44 PM2020-08-02T23:44:09+5:302020-08-02T23:44:45+5:30
कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे.
अनंत पाटील
नवी मुंबई : आगरी कोळी मच्छीमार बांधवांचा वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळी पौर्णिमा सणावर कोरोनाचे गडद सावट असल्याने कोळी समाजात नाराजीचा सूर आहे. येत्या सोमवारी ३ आॅगस्टला राखी पौर्णिमा आणि नारळीपौर्णिमा आहे. कोळी समाजात या सणाला खूप महत्त्व दिले जाते. नारळी पुनवेला दर्याचा राजा सोन्याचा नारळ वाहून होड्या मासेमारीला जातील, सोन्यासारखे मासे पकडून किनाºयावर आणेल, पण ते घ्यायला त्याच्यापर्यंत लोक येणार नाहीत. येईल त्या भावात ही दर्याची श्रीमंती विकावी लागेल. त्यामुळे यंदा या सणालाच कोरोनाचे ग्रहण लागले आहे.
नवी मुंबई, मुंबई, रायगडपर्यंतच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमार कोळी बांधवांच्या, तसेच मासळी विक्रेत्या महिलांच्या मनात यंदाच्या नारळी पौर्णिमेच्या सणावर सावट आहे. मात्र, त्यातूनही नवी दिशा दिसेल, अशी आस त्यांच्या मनात आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे. नव्याने सुरू होणाºया नारळी पौर्णिमेच्या हंगामामध्ये लॉकडाऊनमध्ये मासळी मार्केट खुले करून व निर्यात सुरू करावी.
- किरण कोळी, सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
दरवर्षी आमच्या कोळीवाड्यातून वाजत गाजत मिरवणूक निघते. मात्र, या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने यंदा सणाची मज्जाच गेली आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण करणार आहोत आणि हे कोरोनाच संकट लवकर सरू दे, असे सागराला गाºहाणे घालणार आहोत.
- विलास झेंडेकर, अलिबाग
नारळी पौर्णिमा सणाची तयारी १५ ते २० दिवसांपासून सुरू असते. या सणाला कुटुंबातील महिलांची एकत्र येऊन गोड पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असते. आम्ही नटून थटून सागरदेवाला नारळ अर्पण करतो.
- कविता वरळीकर, वरळी कोळीवाडा
नारळी पौर्णिमा कोळ्यांची विशेष असते. या दिवशी आम्ही सर्व कोळी महिला सागराला विनंती करतो की, मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण कर. या वर्षी कोरोनाचे संकट आमच्या धंद्यावर आहे. - दीपाली गझने, दिवाळे कोळीवाडा
यंदा महामारीत नारळी पौर्णिमा अगदी साध्या पद्धतीत साजरी करणार आहोत. पारंपरिक पध्दतीने निघणारी मिरवणूक पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे.
कामेश कोळी - करंजा कोळीवाडा