कोरोनामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेते धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:33 PM2021-02-27T23:33:47+5:302021-02-27T23:33:59+5:30
व्यवसाय डबघाईला येण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : २०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनामुळे आर्थिक टंचाईचे गेले. सर्वच व्यवसाय आणि नोकऱ्यांवर या कोरोनाने गदा आणली. नवे वर्ष सुरू होतानाच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या शाळा आणि कोरोनाने पुन्हा वर काढलेले डोके यामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत. सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद पडल्या, तर व्यवसाय पूर्णतः डबघाईला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच शाळा सुरू झाल्याने स्टेशनरी विक्रेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. शाळेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारातील वह्या, पेन, विविध प्रकारचे कागद, खडू, पेन्सिल आदी साहित्य विक्री सुरू झाली. यामुळे शैक्षणिक साहित्य पुरवठादारांनीदेखील साहित्य पुरवठा करण्यास सुरुवात केली. शैक्षणिक साहित्यामध्ये गुंतलेला पैसा आणि अनेकांनी या व्यवसायासाठी काढलेले कर्जे गेली वर्षभर फेडणे अशक्य झाले होते. शाळा सुरू झाल्याने या व्यवसायाचे चक्र पुन्हा सुरू झाले होते. मात्र हे चक्र पुन्हा थांबते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.
महाडमध्ये छोटे-मोठे धरून किमान २० ते २५ शैक्षणिक साहित्य विक्रेते आहेत. संपूर्ण तालुक्यातील आणि शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य महाड शहरातूनच नेले जाते. शिक्षण ऑनलाईन सुरू असल्याने शैक्षणिक साहित्याची मागणी पूर्णतः बंद आहे.
संचारबंदी, कोरोना या सगळ्यामध्ये लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेली वर्षभर शाळा बंद राहिल्याने शैक्षणिक साहित्याची विक्री ठप्प झाली आणि पडून राहिलेल्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा अशी स्थिती निर्माण झाली, तर हा व्यवसाय डबघाईला येईल
- सुरेंद्र नाझरे, दुकानदार, महाड
२०२० मध्ये शाळा सुरू होण्याच्या तोंडावर मागणी केलेले शैक्षणिक साहित्य कोरोनामुळे पडून राहिल्याने हे साहित्य खराब झाले आहे. यामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. पेनची शाई खराब होणे, कागदावर धूळ बसल्याने कागद खराब होणे, विविध प्रकारातील रंग सुकून गेले, अशाप्रकारचे नुकसान शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांना सहन करावे लागले आहे.
- मुबीन देशमुख,
दुकानदार, महाड