निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी तरुण मंडळी सर्वाधिक कारणीभूत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घरातच राहत असले तरी त्यांच्याच घरातील तरुण मंडळी विविध कारणांनी बाहेर जाऊन कोरोना घेऊन घरी परत येत असल्यामुळे घरातील मंडळी कोरोनाची शिकार होत असल्याचे दिसत आहे.भाजी, औषधी किंवा किराणा वगैरे घेण्याचे सोडून इतर कामाने किंवा मित्र मंडळींच्या भेटीगाठीसाठी तरुण मंडळी सहजरीत्या घराबाहेर पडत आहेत. कोरोनापेक्षा त्यांना पोलिसांची भीती वाटत असली तरी विविध कारणे पुढे करून ते घराबाहेर पडतात. बाहेरून घरात कोरोना आणल्यावर ते घरातील लोकांच्या संपर्कात येऊन ज्येष्ठ व बालकांना हसत-खेळत कोरोनाची भेट देत आहेत. यामुळेच २४ तास घरातच राहणारे ज्येष्ठ व लहान बालकेही कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी त्यांच्याच घरातील तरुण मंडळी कारणीभूत आहेत. ज्या तरुणांनी घरात कोरोना आणला ते सुखरूप आहेत. परंतु घरातील ज्येष्ठांना त्यांनी जीवन - मरणाच्या दारात नेऊन सोडले आहे. तरुणांच्या बेजबाबदारपणाला घरातीलच मंडळींनी लगाम लावण्याची गरज आहे व तेव्हाच कोरोनाला आळा बसेल.
बाहेरून घरी आल्यास ही घ्या काळजी आपण कामानिमित्त किंवा बाजारातून घरी परतल्यास घरात प्रवेश करण्याच्या अगोदर साबणाने आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. जेणेकरून बाहेरून आलेला कोरोना विषाणू घरात प्रवेश करणार नाही.आंघोळ करण्यासाठी काढलेले कपडे व आंघोळीनंतरचे कपडे एका बादलीत कपडे धुण्याचे पावडर असलेल्या पाण्यात भिजत ठेवावेत. भाजीपाला आणल्यास तोही मिठाच्या पाण्यातून धुऊन काढावा. बाहेरून घरी आल्यावर गरम पाणी प्यावे, हळदीचा चहा घ्यावा, गरम अन्न खावे, आइसक्रीम किंवा थंड पदार्थांचे सेवन टाळावे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नियमितपणे तोंडाला मास्क लावावा. शारीरिक अंतर ठेवूनच इतर आवश्यक कामे करावीत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडणारे स्वतःचा व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी प्रत्येकाने विचार करावा.- डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक
ही पाहा उदाहरणे...nसध्या लग्नसराईमुळे जणू कोरोनाला निमंत्रणच मिळाले आहे. लग्नसमारंभात झालेल्या गर्दीमुळे सध्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात तरुणाईचा हुल्लडबाजीपणा अंगलट येत आहे.nघरातील मंडळीशिवाय माझा दुसऱ्या कुणाशीही संपर्क आला नाही. घरातील मंडळी खूप कमी प्रमाणात घराबाहेर जातात. तरीही मी कोविड पॉझिटिव्ह आलो. गृहकामासाठी, काही साहित्य आणण्यासाठी घरातील मंडळी बाहेर जाणार नाही तर काय. परंतु खूप काळजी घेऊनही आम्ही पाॅझिटिव्ह आलो आहोत. आताही काळजी घेणे सुरूच असल्याचे एका आजोबांनी सांगितले.