कोरोना रुग्णांचा आधार ठरत आहेत परिचारिका, मनात सतत कुटुंबाची भीती, अनेकींच्या मुलांना मिळेना आईच्या मिठीची उब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:36 AM2021-05-13T10:36:16+5:302021-05-13T10:38:43+5:30
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गेले १४ महिने रुग्णांना मायेची ऊब देऊन आधार दिला आहे. रुग्ण हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजचा दिवस आहे. त्या अविरतपणे रुग्ण सेवा करीत आहेत. कोरोनाने निष्पापांना लक्ष्य करून लाखो नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे.
निखिल म्हात्रे -
अलिबाग : माणूस अंथरुणाला खिळला, एकदा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे आपल्यापासून दुरावतात. अशावेळी कुठलेही रक्ताचे नाते नसताना आणि कोणत्याही नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपली म्हणून साथ देते, औषध देते, मानसिक आधार देते ती म्हणजे परिचारिका.
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गेले १४ महिने रुग्णांना मायेची ऊब देऊन आधार दिला आहे. रुग्ण हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजचा दिवस आहे. त्या अविरतपणे रुग्ण सेवा करीत आहेत. कोरोनाने निष्पापांना लक्ष्य करून लाखो नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे. त्यामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबाॅय तसेच सफाई कर्मचारी आपल्या जीवाचा विचार न करता कर्तव्य बजावत आहेत. तसेच कुटुंबापासून दूर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना आधारही देत आहेत.रुग्णांच्या जवळ २४ तास कोणी असेल तर त्या परिचारिका आहेत. या परिचारिकांना आपले कुटुंब देखील आहे. रुग्ण सेवा करून घरी परतत असताना मी माझ्या सोबत काही घेऊन तर जात नाही ना, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होईल, अशी भीती कायम मनात सतावत असते. याच कारणासाठी घरी परतत असताना रुग्णालयातील स्टाफ नर्सना असलेला ड्रेस कोड तेथेच ठेऊन दुसरे कपडे परिधान करून घरची वाट धरावी लागत आहे. अंघोळ करूनच कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांनाही अंगवळणी पडले आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस ते सुद्धा थेट त्यांच्या आईला बिलगत नाहीत.
प्रशिक्षणामुळे भीती झाली दूर
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या जवळ कसे जायचे, आपल्याला काही झाले तर, त्याचा संसर्ग आपल्या कुटुंबातील सदस्याला होईल अशी भीती मनामध्ये घर करीत होती. मात्र सरकारने योग्य प्रशिक्षण दिल्याने परिचारिका रुग्णालयातील एक परिवार आणि घरी एक परिवार यांच्यात ताळमेळ घालून काम करत आहेत.
कोरोनाच्या दहशतीमुळे रुग्णाजवळ जाताना भीती वाटायची. मात्र योग्य प्रशिक्षणामुळे आता भीती वाटत नाही. रुग्ण हे आपल्या विश्वासावरच रुग्णालयात भरती झालेले असतात. त्यामुळे त्यांना बरे करून सुखरुप त्यांच्या घरी पाठवणे हेच ध्येय आता उराशी बाळगले आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्ण हा जरी आमच्या ओळखीचा नसला तरी तो आपल्याच परिवारातील एक आहे.
- प्रतीक्षा मुल्ल्या, कोविड वाॅर्ड-जिल्हा रुग्णालय.
रुग्ण कोणत्या ठिकाणचा आहे यापेक्षा तो आपल्या विश्वासावर आला आहे. त्यामुळे निश्चितच आमच्यावरील जबाबदारी वाढत आहे. रुग्णांची काळजी घेताना त्याहून अधिक काळजी आम्हाला आमच्या घरी जाताना घ्यावी लागते.
-प्रभा तारी, जिल्हा रुग्णालय.
मागील महिनाभरापासून मी कोविड आयसोलेशन वाॅर्डमध्ये काम करीत आहे. रुग्णांची शुश्रूषा करीत असताना मलाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र रुग्णांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे १४ दिवसातच मी पूर्ण बरी झाले. पंधराव्या दिवशी पुन्हा मी माझ्या कर्तव्यास हजर झाले. ते आजही अविरतपणे काम पूर्णत्वास नेत आहे. घरी तीन वर्षाचे माझे बाळ आहे. त्याची पूर्ण जबाबदारी घेऊनच माझ्या कुटुंबाच्या सहकार्यामुळे मी अविरतपणे रुग्णांना सेवा देत आहे.
- सुचिता पाटील, कोविड वाॅर्ड-जिल्हा रुग्णालय.
जनकल्याण समितीतर्फेही सन्मान
रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांच्यासह संघाचे तालुका कार्यवाह अविनाश मोरे, जिल्हा कार्यकर्ते रोहित कुलकर्णी, सचिन कुंटे, ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त डॉक्टर डोंगरे, डॉक्टर वानखेडे, डॉक्टर ठाकूर यांच्या रुग्णालयात जाऊन तेथील परिचारिकांचा गुलाबपुष्प आणि कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
खोपोली : कोरोनाचे महाभयानक संकट असूनही आज जगभरात सर्व दवाखान्यांत आपल्या घरादाराची पर्वा न करता रुग्णांची सेवा करण्यात मग्न आहेत. खोपोलीत सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व कोरोनासाठी उपचार देणारे डॉ. कुलकर्णी हॉस्पिटल व जाखोटीया हॉस्पिटल येथील परिचरिकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब व सन्मानाचा राजा श्रीफळ देऊन परिचरिकांचा गौरव करण्यात आला.