निखिल म्हात्रे अलिबाग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळातील नऊ महिन्यांत रायगड जिल्ह्यात ५२ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेऊन जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ४०टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे स्वॅब व अँटिजन टेस्ट करण्याचे प्रमाणही आता जवळपास ६० टक्क्यांनी कमी झाले आहे.अति अशक्तपणा, दीर्घकाळ सर्दी-खोकला, तसेच सततचा येणारा ताप अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅब व अँटिजन तपासणी रायगड जिल्ह्यात करण्यात येत आहे, तसेच ५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२ हजार ४८ रुग्णांची संख्या पार केली आहे. १ लाख ८७ हजार ७६३ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १,४६८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या रुग्णांची आजची संख्या २ हजार ३२० आहे. या व्यक्तींना अधिक उपचारासाठी जिल्ह्यात ४५ कोविड सेंटर उभारली.
नागरिक सध्या जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत असल्याने कोरोनाचा वाढता रेशो आता खालावला आहे. त्यामुळे स्वॅब वा अँटिजन टेस्ट करण्याच्या प्रमाणात आता घट झाली आहे. - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक