पर्यटन महोत्सवावर कोरोनाचे सावट, मुरुड नगरपरिषदेतर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:26 AM2020-12-20T00:26:05+5:302020-12-20T00:26:30+5:30
Murud : शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून गर्दीवर बंधने लादली आहेत. लग्न समारंभासाठी फक्त ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.
मुरुड-जंजिरा : मुरुड-जंजिरा नगरपरिषदेतर्फे दरवर्षी पर्यटन महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. २९ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत हा पर्यटन महोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा होत असतो, परंतु यंदा या पर्यटन महोत्सवावर कोरोनाचे सावट असून, हा पर्यटन महोत्सव साजरा होणार नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत.
शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून गर्दीवर बंधने लादली आहेत. लग्न समारंभासाठी फक्त ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. अशातच पर्यटन महोत्सवावरही निर्बंध असणार आहेत. पर्यटन महोत्सवात हजारोच्या संख्येने पर्यटक व स्थानिक नागरिक विविध कार्यक्रम पहाण्यास येत असतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण कसे ठेवावे, हा मोठा प्रश्न असल्याने यंदाचा पर्यटन महोत्सव होणार की नाही, याबाबत मुरुड नगरपरिषदेने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
डिसेंबर महिन्याच्या ५ ते १० तारखेच्या दरम्यान शहरातील नागरिकांची सभा आयोजित करून पर्यटन महोत्सवाचे नियोजन करून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली जाते, परंतु अद्याप ही सभा झालेली नाही. महोत्सवाचे नियोजन अथवा कोणतेही बैठक घेण्यात न आल्यामुळे यंदाच्या पर्यटन महोत्सवावर कोरोनाची दाट छाया पसरलेली दिसत आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अथवा कोणताही पदाधिकारी बोलत नसल्याने या महोत्सवावर प्रश्नचिन्ह आहे.