कोरोना काळात गणवेशासाठी आठ लाखांचा निधी केला खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 01:46 AM2021-05-04T01:46:37+5:302021-05-04T01:46:57+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील २८८ विद्यार्थ्यांना लाभ : वर्ष संपल्यानंतर वाटप

Corona spent Rs 8 lakh on uniforms during the period | कोरोना काळात गणवेशासाठी आठ लाखांचा निधी केला खर्च

कोरोना काळात गणवेशासाठी आठ लाखांचा निधी केला खर्च

googlenewsNext
ठळक मुद्देराज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग उन्नतीनुसार उत्तीर्ण करण्यात आले.

संतोष सापते

श्रीवर्धन : कोरोना विषाणूने महाराष्ट्रातील अनेक शाळांना कुलूप लावले. सन २०२०ला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्या कारणाने सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आली. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली. 

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग उन्नतीनुसार उत्तीर्ण करण्यात आले. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर मोठ्या स्वरूपात परिणाम झाल्याचे दिसून येते. अशा गंभीर प्रसंगी श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दिसून आले आहे.
प्राप्त माहितीनुसार ११ फेब्रुवारी २०२१ ला श्रीवर्धन तालुक्यातील समग्र शिक्षा अभियान या उपक्रमांतर्गत आठ लाख एक हजार नवशे रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील ९९ जिल्हा परिषद शाळा व पाच नगरपरिषद शाळांना दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ ला त्याचे वितरण करण्यात आले. या निधीचे प्रयोजन शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे असते. मात्र, चालू शैक्षणिक वर्षात एकही दिवस शाळा भरलीच नाही, तरीसुद्धा गणवेशाचे वाटप वर्ष संपल्यानंतर करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी संपूर्ण महाराष्ट्र झगडत असताना आर्थिक टाळेबंदी व इतर आर्थिक समस्यांना तोंड देत असताना शिक्षण विभागाने गणवेश वाटपासाठी घेतलेला निर्णय निश्चितच संयुक्तिक वाटत नाही. तसेच आलेला  निधी स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व शाळा शिक्षण समिती प्रत्यक्ष लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करू शकत होती; मात्र गणवेश वाटपाचा निर्णय स्थानिक समितीने घेतलेला आहे.  समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, तसेच अनुसूचित जाती जमाती वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सदरच्या निधीचा लाभ दिला जातो. 

जिल्हा परिषदमधील ९९ शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना या योजनेतून गणवेश वाटप करण्यात आला. श्रीवर्धन नगरपरिषद पाच शाळांमध्ये २८८ विद्यार्थ्यांना सदरच्या योजनेतून गणवेश वाटप करण्यात आले. श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या शाळांनी सोमवारी निकालासोबत गणवेशाचे वाटप केले. इयत्ता चौथीच्या वर्गातून पाचवीला जाणाऱ्या विद्यार्थ्याला सदरच्या गणवेशाचा उपयोग शून्य ठरणार आहे. कारण तालुक्यातील लोकांचा शैक्षणिक दृष्टिकोन बघता इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते. त्यानंतर पाचवीपासून माध्यमिक विद्यालयात पाठविले जाते. ऑनलाईन शिक्षण पद्धतीस मदतदायी ठरेल असा निर्णय स्थानिक शाळा समिती व शिक्षण समितीने घेणे अगत्याचे होते अशी चर्चा पालकवर्गात रंगली आहे. विद्यार्थ्यांच्या वर्ग उन्नतीचा आनंद पालकांना आहे. त्या आनंदाच्या भरात शाळेकडून मिळणारे गणवेशाचे बक्षीस पालक वर्गांनी हसत-हसत स्वीकारले आहे. मात्र, मिळालेल्या गणवेशाचा उपयोग काय असा प्रश्न पालक आपसात विचारताना दिसून आले.

यावर्षी निधी उशिरा प्राप्त झाला आहे. आदेशानुसार योग्य कार्यवाही करण्यात आली आहे. प्राप्त निधीचे अधिकार स्थानिक शाळा शिक्षण समितीला आहेत. 
    - शीतल तोडणकर, 
गट शिक्षण अधिकारी

आज नगरपरिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल देण्यात आले त्यासोबत मुलीचा गणवेशसुद्धा देण्यात आला आहे.
- सुनीता वडमारे, 
पालक नगरपरिषद शाळा

माझा मुलगा चौथी पास झाला आहे. आज शाळेने त्याला गणवेश दिला. आम्ही त्याला पाचवीसाठी हायस्कूलमध्ये पाठविणार आहोत. मिळालेल्या गणवेशाचा उपयोग समाजातील गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी करू.
    - राजा भगत, पालक श्रीवर्धन नगरपरिषद

 

Web Title: Corona spent Rs 8 lakh on uniforms during the period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड