रायगड : राज्यातील काेराेना रुग्णांचा आकडा वाढतानाचे चित्र असले तरी, समाधानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये काेराेना विषाणूच्या प्रसाराने अद्याप उसळी मारल्याचे दिसत नाही. १ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ या १२ दिवसांमध्ये ५२२ रुग्ण वाढल्याचे दिसते. तर सात रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे; मात्र रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण उल्लेखनीय असल्याने काेराेनाची दहशत कमी झाली आहे. जिल्ह्यात ८ मार्च २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण सापडला हाेता. त्यानंतर काेराेनाचा प्रसार झपाट्याने सुरू झाला हाेता. देशभरातही काेराेनाचा कहर वाढत असल्याने केंद्र सरकारने लाॅकडाऊन घाेषित केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार ठप्प झाले हाेते. हाताला काम नसल्याने माेठ्या प्रमाणात कामगारांचे स्थलांतरण या कालावधीत झाले. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने मुंबई-पुण्यातील चाकरमानी आपापल्या गृही परतले हाेते. याच कालावधीत विविध सण असल्यानेही काेराेनाचा कहर वाढला हाेता. जुलै, सप्टेंबर या कालावधीत काेराेना रुग्णांच्या संख्येने प्रचंड प्रमाणात डाेके वर काढले हाेते. त्यामुळे सरकार आणि प्रशासनासह सर्व नागरिक चांगलेच हादरुन गेले हाेते. या कालावधीत रुग्णांचा आकडा हा दिवसात एक हजारांच्या घरात गेला हाेता. विविध केलेल्या उपाय याेजनांमुळे काेराेनाचा कहर जिल्ह्यातून हळूहळू कमी हाेत गेला. त्यामुळे सरकारने सर्व व्यवहार टप्प्या-टप्प्याने सुरू केले. आता तर सरकारने लाेकल रेल्वेही सुरू केली आहे. या आधीच शाळा, महाविद्यालये, पर्यटन यासह एसटी बसेसही सुरू झाल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काेराेनावरील लस बाजारात आली. पहिल्या टप्प्यांमध्ये आराेग्य कर्मचारी, फ्रंटवर काम करणारे यांना ही लस टाेचण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागांमध्ये काेराेनाचा कहर दिसत आहे; मात्र रायगड जिल्ह्यामध्ये सध्या तरी काेराेनाची दहशत दिसून येत नाही. दिवसाला नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे सुमारे २५ असल्याचे आकडेवारीवरून दिसते. पेण, कर्जत, खाेपाेली भाग रेल्वेने जाेडलेला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या असतानाही काेराेनाचा प्रभाव वाढलेला दिसत नाही.
१ फेब्रुवारी २१ राेजी २७ नवीन रुग्ण सापडले हाेते. त्यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५९ हाेती. तर एकाही रुग्णाचा काेराेनामुळे मृत्यू झाला नाही. त्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६२,०७४ हाेती तर ५९,८४२ रुग्णांनी काेराेनावर मात केली हाेती. या कालावधीपर्यंत १६८५ जणांचा मृत्यू झाला हाेता. १२ फेब्रुवारी राेजी ४३ नवीन काेराेना रुग्ण सापडले, तर ४९ रुग्ण बरे झाले आहेत. १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण रुग्ण संख्या ६२ हजार ६०६ हाेती, तर ६० हजार ३६० रुग्ण काेराेनातून मुक्त झाले. १ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत सात काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा हा १६९२ इतका आहे.
जिल्ह्यासाठी काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सीन या दाेन लस उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १६ हजार ५०० आराेग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइऩ वर्कर्स यांना काेराेनाची लस देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील १५ ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. आजपर्यंत १० हजार ९ जणांना काेराेनाची लस टाेचण्यात आली आहे. त्यामध्ये १३ हजार ५४५ पैकी दाेन हजार ८७८ फ्रंट लाइन वर्कर्सना लस टाेचण्यात आली आहे, तर ११ हजार ५६८ पैकी सात हजार १३१ आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. अद्यापही सहा हजार ४५१ जणांना लस देणे बाकी आहे. आजघडीला सुमारे ६० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आजही ज्यांनी पहिल्यांदा लस टाेचून घेतली हाेती, त्यांना २८ दिवसांनंतर दुसऱ्यांदा लस टाेचण्यात आली आहे, तसेच केंद्र सरकारकडून त्याबाबतचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.
आतापर्यंत ४० हजार ५०० डाेस उपलब्धरायगड जिल्ह्याला सुरुवातीला काेव्हीशिल्डचे नऊ हजार ५०० डाेस प्राप्त झाले हाेते. त्यानंतर ११ हजार डाेस उपलब्ध झाले हाेते. १२ फेब्रुवारी राेजी आणखीन ११ हजार डाेस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे ९ हजार काेव्हॅक्सीनचे डाेसही १२ फेब्रुवारीलाच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. काेव्हॅक्सीनचे डाेस फक्त अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात देण्यात येणार आहेत.