पनवेल तालुक्यात 4,030 शिक्षकांची कोरोना चाचणी; आरटीपीसीआय तपासणीला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:03 AM2021-01-28T00:03:57+5:302021-01-28T00:04:46+5:30

राज्यात ९वी ते १२वी वर्गांच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता शासनाकडून ५वी ते ८वी वर्गांच्या शाळा २७ तारखेपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Corona test of 4,030 teachers in Panvel taluka; RTPCI investigation begins | पनवेल तालुक्यात 4,030 शिक्षकांची कोरोना चाचणी; आरटीपीसीआय तपासणीला सुरुवात 

पनवेल तालुक्यात 4,030 शिक्षकांची कोरोना चाचणी; आरटीपीसीआय तपासणीला सुरुवात 

Next

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली :  कोरोनाकाळात गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २७ पासून सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू होण्याअगोदर पनवेल तालुक्यातील ४,०३० शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात असून, आतापर्यंत २६३ शिक्षकांची चाचणी झाली आहे. आजपासून बहुतांश शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत शाळेत जाण्यास उत्सुकता दिसून येत आहे

राज्यात ९वी ते १२वी वर्गांच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता शासनाकडून ५वी ते ८वी वर्गांच्या शाळा २७ तारखेपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पनवेल तालुक्यातील जि. प. शाळांसह खासगी शाळा सुरू करण्याच्या हालचालींना गती आली आहे. त्याअगोदर पनवेल तालुक्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना काळात शिक्षकांनी बाहेर फिल्डवर राहून विविध कामे केली आहेत. त्यामुळे मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता कोरोना चाचणी करून घेणे शिक्षकांना अनिवार्य करण्यात आले आहे. 

पनवेल तालुक्यात एकूण ४१७ शाळा आहेत तर ४,०३० शिक्षक, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यानुसार २५ जानेवारीपासून कोरोना चाचणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २६३ शिक्षकांची चाचणी झाली असून लवकरच उर्वरित शिक्षकांची चाचणी होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. पनवेल तालुक्यात शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसात शंभरच्या जवळपास शिक्षकांची चाचणी होत आहे. पूर्णपणे चाचणी न झाल्याने शाळा सुरू होण्यास एक दिवस लांबणीवर गेला आहे.

दोन केंद्रांवर होते तपासणी

पनवेल तालुक्यातील ४,०३० शिक्षकांची कोरोना चाचणी पनवेल उपजिल्हा रुग्णालय व पनवेल आरोग्य केंद्रात करण्यात येत आहे. या दोनच आरोग्य केंद्रांवर भार पडला आहे. आरोग्य केंद्रे कमी आणि शिक्षक जास्त झाल्याने शाळा सुरू करण्यास विलंब होत आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून पनवेल तालुका आरोग्य विभागाकडे केंद्रे वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. तीन दिवसांत फक्त २६३ चाचण्या झाल्या आहेत. उर्वरित ३,७६७ शिक्षक वेटिंगवर असल्याने सर्व शाळा सोमवारपासून सुरू होतील, असे दिसत आहे.

पनवेल तालुक्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासणीचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्याला विलंब होत असला तरी सर्व शिक्षकांची चाचणी होणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. तसेच शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोनाबाबतची काळजी घेण्यात येत आहे. - नवनाथ साबळे, गट शिक्षण अधिकारी पनवेल

Web Title: Corona test of 4,030 teachers in Panvel taluka; RTPCI investigation begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.