अलिबाग : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मागील ८ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकांना कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. गंभीर बाब म्हणजे जिल्हा सरकारी रुग्णालय आणि पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातच काेराेना टेस्ट करण्यात येत असल्याने कमी कालावधीत टेस्ट हाेणार कशा, असा प्रश्न आहे.
कोरोना चाचणी केंद्रावर होत असलेली गर्दी, नियोजनाचा अभाव, काही ठिकाणी अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच मोफत चाचणी करून देण्याचे आदेश व तालुक्यांतील शिक्षकांची चाचणी न करणे अशा अनेक गोष्टींमुळे हा संभ्रम व सावळागोंधळ निर्माण झाला आहे. पनवेल महानगरपालिकेने तर फक्त अनुदानित शाळांची मोफत आरटीपीसीआर चाचणी उपजिल्हा व महानगरपालिका रुग्णालयात होईल, असे सांगितले आहे.
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने मागील चार दिवसांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात व पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करीत आहेत. दिवसाला २२० ते २४० शिक्षकांची टेस्ट करण्यात येत आहे.- डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक
दिवसाला २२० चाचण्या २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
शिक्षक-प्राध्यापकांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे. दिवसाला २२० चाचण्या होत आहेत.
आतापर्यंत सुमारे तीन हजार शिक्षकांच्या काेरोना चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.