कोरोनाने अडविली पेणमधील गणपती बाप्पांची परदेशवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:43 AM2021-04-04T00:43:29+5:302021-04-04T00:43:40+5:30
मूर्तिकारांना चिंता; मागणी नोंदविलेल्या हजारो ऑर्डर तयार
पेण : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशातील टाळेबंदीचा फटका पेणमधील मूर्तिकारांना बसला आहे. परदेशातील गणेशभक्तांनी मागणी केलेल्या तब्बल २५ ते ३० हजार गणेशमूर्ती मॉरिशस, थायलंड, मलेशिया, ऑस्टेलिया, यूरोप, अमेरिका या खंडांतील देशात असलेले कोरोना प्रतिबंधक नियम व टाळेबंदीमुळे या तयार ॉऑर्डर कशा पोहोचतील या विवंचनेत पेणचे मूर्तिकार सापडले आहेत. गतवर्षीप्रमाणेच या वर्षातसुध्दा कोरोनाचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू महामारीने बाप्पांची परदेशवारी अडविल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले.
दरवर्षी मान्सून हंगामाच्या अगोदर साधारणपणे मार्च, एप्रिल, मे अखेरपर्यंत ७० ते ८० दिवसांच्या कालावधीत परदेशात बाप्पांच्या प्रदेशवारीचा कालावधी असतो. जून उजाडेपर्यंत समुद्रमार्गे या ऑर्डर जुलै महिन्यात मागणी केलेल्या देशांमध्ये सुखरूप पोहोच होत असतात. सध्या पेणमधील मागणी केलेल्या प्रत्येक गणेशमूर्ती कारखान्यात तयार असून परदेशातील टाळेबंदी उठताक्षणी मूर्तींनी भरलेले कंटेनर बाप्पांच्या परदेश वारीला कधी एकदा ग्रीन सीग्नल मिळतो याकडे मूर्तिकारांना प्रतीक्षा करावी लागते आहे. २०२०वर्षात मूर्तिकारांना नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, कोरोना या आलेल्या संकटाला सामोरे जात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवल्यास मोठ्या अर्थिक संकटाची चाहूल सध्याची परिस्थिती पाहता दिसत आहे. राज्यातसुध्दा कोरोनाची दुसरी लाट आल्याने सध्या मूर्तिकारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया या खंडातील देशात कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा पडला आहे. त्यामुळे सर्व संकटांचे निवारण करणाऱ्या बाप्पालासुध्दा कोरोना महामारी चा अडसर आल्याने बाप्पाची परदेश वारी थांबली आहे.