Corona Vaccination: लसीकरणासाठी गर्दी, मात्र साठा संपल्याने परतावे लागले रिकाम्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:32 AM2021-04-10T01:32:39+5:302021-04-10T01:32:48+5:30
महाडमधील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०० नागरिकांना मिळाली नाही लस
दासगाव : महाड तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा आहे. तालुक्यातील दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार सकाळपासूनच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती, तर गुरुवारी ३०० जणांना लस नसल्याने माघारी परतावे लागले.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सुरुवातीला लसीकरणासाठी उत्सुक नसलेले नागरिक आता लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. महाड तालुक्यात सध्या लसीचा तुटवडा निर्माण झाली असून, कोणत्याच सरकारी आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध नाही. शुक्रवारी २०० लोकांना लस देता येईल, एवढी लस दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध होती. तालुक्यातील नागरिकांना समजताच, शुक्रवारी सकाळपासूनच दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर शेकडो लोकांनी गर्दी केली होती. त्यात नेटवर्कचा ही अडथळा असल्याने रजिस्ट्रेशन होण्यास वेळ लागत होता. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २०० लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, आतापर्यंत ७०० नागरिकांचे आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर आफ्रिन खतीब यांनी दिली. या आरोग्य केंद्रात लस संपली असून, पुन्हा जिल्हा आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.