Corona Vaccination : रायगड जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचा लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 03:31 PM2022-01-03T15:31:11+5:302022-01-03T15:44:04+5:30
Corona Vaccination: अलिबाग शहरातील डोंगर हॉल येथील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अनुज शिगवण या लाभार्थ्याला पहिली लस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.
रायगड ः जिल्ह्यात आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला २४ लसीकरण केंद्रांवर सुरुवात झाली. अलिबाग शहरातील डोंगर हॉल येथील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अनुज शिगवण या लाभार्थ्याला पहिली लस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.
या केंद्रावर ३०० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. कोरोनाचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन नंतर कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याते दिसून येते. सरकारने १८ ते ६० वर्षांच्या पुढे असणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणाला या आधीच सुरुवात केलेली आहे. ० ते १८ वयोगटातील नागरिकांनी लस कधी मिळणार याबाबत सरकारने निर्णय घेतला नसल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून १५ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील या वयोगटातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद द्यावा, तसेच स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचेही कोरोनापासून संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्विकारण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात २४ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय (अलिबाग, चौक, जेएनपीटी-उरण, कर्जत, कशेळे, खोपोली, महाड, म्हसळा, माणगाव, मुरुड, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन) अशी १४ आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका क्षेत्रातील १० नागरी आरोग्य केंद्रे येथील लसीकरण केंद्रांवर ही लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
कोविन संकेतस्थळावर करा नोंदणी
लसीकरणासाठी जिल्ह्यात १५ ते १८ या वयोगटातील मुलामुलींची अंदाजित संख्या एक लाख ४५ हजार ३८३ इतकी आहे. या सर्वांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी कोविन संकेतस्थळावर १ जानेवारी २०२२ पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.